सांगली : कुकटोळीत घरावर सशस्त्र दरोडा दाम्पत्यास मारहाण : साडेअठरा लाखाची रोकड लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 02:37 PM2018-11-20T14:37:49+5:302018-11-20T14:39:05+5:30
कुकटोळी (ता. कवठेमहांकाळ) येथील कुंडलिक पांडूरंग वासुदकर (वय ४३) यांच्या घरावर सहा जणांच्या टोळीने सशस्त्र दरोडा टाकून सुमारे साडेअठरा लाखाची रोकड लंपास केली.
सांगली : कुकटोळी (ता. कवठेमहांकाळ) येथील कुंडलिक पांडूरंग वासुदकर (वय ४३) यांच्या घरावर सहा जणांच्या टोळीने सशस्त्र दरोडा टाकून सुमारे साडेअठरा लाखाची रोकड लंपास केली. टोळीने वासुदकर यांच्यासह त्यांच्या पत्नी रुपाली (३८) यांना बेदम मारहाण केली. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली.
कुंडलिक वासुदकर हे पत्नी, आई-वडिल व मुलींसमवेत वासुदकर वस्तीवर राहतात. सोमवारी रात्री वासूदकर कुटूंब जेवण करुन झोपी गेले होते. मध्यरात्री दोन वाजता सहा जणांच्या टोळीने त्यांच्या घराच्या दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. दरवाजा तुटल्याच्या आवाजाने वासूदकर कुटूंब जागे झाले. टोळीने कुºहाड व चाकूचा धाक दाखविला. कुंडलिक यांना पोटात लाथा मारल्या. त्यांच्या पत्नी रुपाली यांच्या उजव्या हातावर काठीने मारहाण केली. त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसडा मारुन काढून घेतले. कुºहाडीने कपाटाचा हॅण्डल लॉक तोडला. लॉकरमधील साडेअठरा लाख रुपयांची रोकड लंपास करुन टोळीने पलायन केले.
टोळीने अवघ्या पंधरा मिनीटात वासुदकर यांच्या घरावर दरोडा टाकला. या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे, सहाय्यक निरीक्षक अमितकुमार पाटील व कवठेमहांकाळ पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. टोळीच्या शोधासाठी कवठेमहांकाळ तालुक्यात नाकाबंदी करण्यात आली होती. पहाटेपर्यंत संशयित वाहने थांबवून चौकशी सुरु होती. पण काहीच धागेदोरे लागले नाहीत. याप्रकरणी कुंडलिक वासुदकर यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड तपास करीत आहेत.
जमीन विक्रीची रक्कमवासुदकर यांनी सोमवारी त्यांच्या जमीन विक्रीचा व्यवहार केला होता. यातून ही साडेअठरा लाखाची रोकड त्यांच्याजवळ आली होती. ही रोकड ते मंगळवारी बँकेत भरण्यास जाणार होते. तोपर्यंत टोळीने त्यांच्या घरावर दरोडा टाकून ही रोकड पळविली. दरोडेखोर हे परिसरातील असावेत. वासुदकर यांच्याकडे जमीन विक्रीतून साडेअठरा लाख रुपये आले आहेत, याची माहिती असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
मराठीत बोलणे
दरोडेखोर २० ते २१ वयोगटातील होते. एकजण मध्यम, तर अन्य पाचजण अंगाने सडपातळ होते. एकाने काळ्या रंगाचा फूल टी-शर्ट व नाईट पॅन्ट घातली होती. रुपाली यांना मारहाण करणाºया दरोडेखोराने काळ्या रंगाचे जॅकेट घातले होते. सर्वजण मराठीत बोलत होते. त्यांनी तोंडाला रुमाल बांधले होते.