राज्यातील पहिल्या स्मार्ट ५० बाजार समित्यांमध्ये सांगली, आटपाडी
By अशोक डोंबाळे | Published: September 2, 2022 06:26 PM2022-09-02T18:26:56+5:302022-09-02T18:27:23+5:30
सांगली बाजार समितीला विविध सुविधांमुळे १३५.५० गुण मिळाल्याने २३ वे स्थान मिळाले.
सांगली : पणन संचालनालयाकडून राज्यातील ३०५ कृषी उत्पन्न बाजार समित्यांची २०२१-२०२२ या वर्षांची क्रमवारी जाहीर झाली आहे. स्मार्ट प्रकल्पांतर्गत पणन विभागाने बाजार समित्यांचे गुणांकन केले होते. या रँकिंगमध्ये राज्यातील पहिल्या ५० स्मार्ट बाजार समित्यांमध्ये सांगली २३ तर आटपाडी बाजार समितीला ३९ आणि तासगाव बाजार समितीला ६६ वे रँकिंग मिळाले आहे.
राज्य पणन संचालनालयाला जागतिक बँकेकडून आर्थिक सहकार्य करुन राज्यातील बाजार समित्यांमध्ये सुधारणा करुन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यांतर्गत बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत ३५ निकषांची तपासणी करुन २०० गुण देण्यात आले होते. पणन संचालनालयाने जााहिर केलेल्या क्रमवारित सांगली बाजार समितीला विविध सुविधांमुळे १३५.५० गुण मिळाल्याने २३ वे स्थान मिळाले आहे.
१२६.५० गुणांसह आटपाडी बाजार समिती राज्यात ३९ व्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील तासगाव बाजार समिती १११ गुण मिळवून राज्यात ६६ वा क्रमांक पटकविला आहे. माजी मंत्री जयंत पाटील यांच्या ताब्यातील इस्लामपूर बाजार समितीला ८३.५० गुण मिळाले असून राज्यात १०७ तर माजी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या ताब्यातील पलूस बाजार समितीला ८० गुण मिळवून राज्यात ११४ व्या क्रमांकावर स्थान मिळाले आहे. विटा बाजार समितीस ७६ गुण मिळाले असून १२० वे तर शिराळा बाजार समितीस सर्वात कमी ५१ गुण मिळाल्यामुळे १४७ व्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.