सांगली : तुंग येथे मगरीचा तरूणावर हल्ला, पायाला गंभीर दुखापत : जीव वाचला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 04:33 PM2018-05-28T16:33:21+5:302018-05-28T16:33:21+5:30
तुंग (ता. मिरज) येथे सोमवारी सकाळी कृष्णा नदीत एका मच्छीमार तरूणावर मगरीने हल्ला केला. महादेव तुकाराम मोरे (वय ५२) असे तरुणाचे नाव आहे. मगरीच्या हल्ल्यात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याने आरडा ओरडा केल्याने मगरीने पाय सोडला आणि त्याचा जीव वाचला.
सांगली : तुंग (ता. मिरज) येथे सोमवारी सकाळी कृष्णा नदीत एका मच्छीमार तरूणावर मगरीने हल्ला केला. महादेव तुकाराम मोरे (वय ५२) असे तरुणाचे नाव आहे. मगरीच्या हल्ल्यात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याने आरडा ओरडा केल्याने मगरीने पाय सोडला आणि त्याचा जीव वाचला.
तुंग येथील कृष्णा नदीत मगरींचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. यापूर्वीही या परिसरात मगरीने अनेकांच्यावर हल्ले केले आहेत. महादेव मोरे हे मच्छीमारीचा व्यवसाय करतात. रविवारी सायंकाळी त्यांनी मासे पकडण्यासाठी नदीपात्रात जाळे टाकले होते सोमवारी सकाळी ते जाळे काढण्यासाठी नदीत उतरले.
जाळे घेऊन नदीकाठी परतत असताना अचानक मगरीने त्यांचा पाय पकडला. मगरीने हल्ला केल्याचे लक्षात येताच महादेव मोरे यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. या आरडाओरडमुळे मगरीने त्यांचा पाय सोडून देऊन नदीत पलायन केले.
मगरीने त्यांच्या पायाला जोरात चावा घेतला असुन पायाला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी अवस्थेतच ते पोहत नदीपात्राबाहेर आले. त्यांना तुंग येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
गेल्याच महिन्यात ब्राह्मनाळ येथे लहान मुलाला मगरीने ओढून नेले होते दोन दिवसांनंतर त्याचा मृतदेह सापडला होता कृष्णा नदीकाठ परिसरात मगरीची मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली आहे. या मगरींचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरीकांच्यातून होत आहे