सांगली : दाम्पत्याचा सांगलीत कर्जास कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 12:37 PM2018-04-02T12:37:57+5:302018-04-02T12:37:57+5:30
दोन बँकांसह एका पतसंस्थेच्या कर्जास कंटाळून रामचंद्र शिवराम शिवगाव (वय ४५) व उज्वला रामचंद्र शिवगाव (४५, दोघे रा. वारणाली, विश्रामबाग) या दाम्पत्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. घटनेची संजयनगर पोलीस ठाण्यात नोंद आहे.
सांगली : दोन बँकांसह एका पतसंस्थेच्या कर्जास कंटाळून रामचंद्र शिवराम शिवगाव (वय ४५) व उज्वला रामचंद्र शिवगाव (४५, दोघे रा. वारणाली, विश्रामबाग) या दाम्पत्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. घटनेची संजयनगर पोलीस ठाण्यात नोंद आहे.
मध्यरात्री विष प्राशन केल्यानंतर दोघेही बेशुद्ध पडले होते. रविवारी सकाळी शेजारची महिला त्यांच्या घरी कामानिमित्त गेली. त्यावेळी ही घटना उघडकीस आली. शेजाऱ्यांनी या दाम्पत्यास उपचारार्थ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले.
दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. रविवारी सायंकाळी रामचंद्र शिवगाव शुद्धीवर आले. पोलीस निरीक्षक रमेश भिंगारदिवे यांनी त्यांचा जबाब नोंदवून घेतला. यामध्ये त्यांनी कर्ज व संधीवाताच्या आजाराला कंटाळून हे कृत्य केल्याचे सांगितले.
रामचंद्र शिवगाव हे खासगी मोटारीवर चालक म्हणून काम करतात. ते पत्नीसोबत वारणालीत राहतात. गेल्या काही दिवसांपासून त्यांना संधीवाताच्या आजाराने ग्रासले आहे. औषधोपचार घेऊनही प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. यातच त्यांच्यावर दोन बँका व एका पतसंस्थेच्या कर्जाचा बोजा आहे.
हे कर्ज थकीत गेले आहे. मार्च अखेरीमुळे बँका व पतसंस्थेचा त्यांच्यामागे वसुलीसाठी तगादा लागला आहे. त्यामुळे ते नाराज होते. पत्नी गाढ झोपेत असल्याचे पाहून शनिवारी मध्यरात्री त्यांनी प्रथम विष प्राशन केले. उलट्याचा त्रास होऊ लागल्याने पत्नीला जाग आली. त्यावेळी त्यांनी विष प्राशन केल्याने सांगितले. त्यानंतर पत्नीनेही विष प्राशन केले.
चौकशी सुरू
शिवगाव यांनी ज्या बँका व पतसंस्थेतून कर्ज काढले होते, त्याची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. वसुलीसाठी बळाचा वापर झाला का, याची माहिती घेतली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. उज्वला शिवगाव या अजूनही बेशुद्ध आहेत. त्यांचा जबाब घेतल्यानंतर यामागील खरे कारण उजेडात येईल, असेही पोलिसांनी सांगितले.