सांगली-बेंगलोर राणी चेन्नम्मा एक्सप्रेसला आता आणखी एक अतिरिक्त जनरल डबा 

By अविनाश कोळी | Published: July 18, 2024 03:39 PM2024-07-18T15:39:45+5:302024-07-18T15:40:13+5:30

पासधारक प्रवाशांची सोय : जनरल तिकिटांचा कोटा वाढला

Sangli-Bangalore Rani Chennamma Express now has one additional general coach  | सांगली-बेंगलोर राणी चेन्नम्मा एक्सप्रेसला आता आणखी एक अतिरिक्त जनरल डबा 

सांगली-बेंगलोर राणी चेन्नम्मा एक्सप्रेसला आता आणखी एक अतिरिक्त जनरल डबा 

सांगली : सांगली-बेंगलोर राणी चेन्नम्मा एक्सप्रेसला आता आणखी एक अतिरिक्त जनरल डब्बा जोडण्यात आला आहे. त्यामुळे पासधारक प्रवाशांची चांगली सोय झाली आहे. जनरल तिकिटांचा कोटाही यामुळे वाढला आहे.

सांगली रेल्वे स्टेशनवरून उगार, चिंचली, रायबाग, चिकोडी रोड, घटप्रभा, गोकाक रोड, पाचापूर, बेळगाव, खानापूर, लोंढा, अलनावर, धारवाड, हुबळी, दावणगिरी, आर्सिकेरी, तुमकूरु, बेंगलोर आदी ठिकाणी जाणाऱ्या जनरल तिकीट व मासिक पास घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेने आनंदाची बातमी दिली आहे.

सांगली-बेंगलोर राणी चन्नम्मा एक्सप्रेस व बेंगलोर-सांगली राणी चेनम्मा एक्सप्रेस या दोन्ही गाड्यांना रेल्वेने एक अतिरिक्त जनरल डब्बा जोडला आहे. त्यामुळे आता सांगली रेल्वे स्टेशन वरून सुटणाऱ्या राणी चेन्नम्मा एक्सप्रेसची क्षमता वाढलेली आहे व जास्त प्रवासी या गाडीने सांगली रेल्वे स्टेशन वरून प्रवास करू शकतील. त्यामुळे सांगलीतून जनरल तिकीट व मासिक पास घेऊन दावणगिरीपर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची विशेष सोय झाली आहे. ज्येष्ठ नागरिक, स्तनदा माता, महिला तसेच रुग्णांना सांगली ते बेळगाव मार्गावर या एक्सप्रेसच्या माध्यमातून आरामदायक प्रवास करता येईल.

अतिरिक्त जनरल डब्यामुळे बसून प्रवास करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे कोणालाही उभे राहून प्रवास करावा लागणार नाही. पश्चिम महाराष्ट्र रेल्वे प्रवासी ग्रुपने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, बेळगाव तसेच धारवाड जिल्ह्यात जाणाऱ्या जास्तीत जास्त प्रवाशांनी सांगली स्थानकावरुन प्रवास करावा.

सांगली स्थानकावर पास उपलब्ध

सांगली ते बेळगावपर्यंतचे मासिक पास सांगली स्थानकावर उपलब्ध आहेत. सांगली ते बेळगाव पास घेतला तर प्रवाशांना सांगली ते बेळगाव कुठल्याही गाडीत प्रवास करता येतो. सांगली ते बेळगाव पासवर मिरज ते बेळगाव मार्गावर कितीही वेळा प्रवास करता येतो, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र रेल्वे प्रवासी ग्रुपने दिली.

Web Title: Sangli-Bangalore Rani Chennamma Express now has one additional general coach 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.