सांगली बाजार समिती निवडणूक: अखेर जयंत पाटील-विशाल पाटील यांचे मनोमिलन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 01:32 PM2023-04-20T13:32:16+5:302023-04-20T13:32:44+5:30
जागा वाटपाचा तिढा आज सुटणार
सांगली : सांगली बाजार समितीत महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये दुरंगी लढत होण्याची चिन्हे असताना निवडणूक बिनविरोध करण्यासाठी नेत्यांमध्ये बुधवारी रात्री उशिरापर्यंत खलबते सुरू होती. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांचे अखेर मनोमिलन झाल्यामुळे आघाडीतील धुसफूस थांबली. भाजपमध्येही पॅनेल निश्चितीसाठी बैठका सुरू होत्या. आज, गुरुवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे.
सांगलीत बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आ. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, मोहनराव शिंदे कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत, जितेश कदम उपस्थित होते. निवडणूक महाविकास आघाडीने एकत्रित लढविण्याचा निर्णय झाला. त्यामुळे आघाडीविरोधात भाजप अशी दुरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली.
उमेदवारी अर्ज माघारीसाठी १२ तास शिल्लक असताना चर्चा सुरू होती. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला. जयंत पाटील आणि विशाल पाटील यांच्यात मतभेद असल्याचे दिसत होते. विशाल पाटील यांनी वसंतदादा सहकार पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचे जाहीर केले होते. त्यासाठी सर्वपक्षीयांना जाहीर निमंत्रण दिले, मात्र जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या बैठका सुरू ठेवल्या होत्या. अखेर जयंत पाटील यांच्या बैठकीला विशाल पाटील यांनी हजेरी लावत आघाडीमार्फत निवडणूक लढवण्याची भूमिका स्पष्ट केली.
जागा वाटपाचा तिढा आज सुटणार
काँग्रेसने नऊ, राष्ट्रवादीने आठ जागांवर दावा केला. महाविकास आघाडीतील शिवसेना, घोरपडे गटास जागा देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. गुरुवारी सकाळी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जाईल. दरम्यान, भाजपच्या जागा वाटपाबाबत अंतर्गत चर्चा सुरू असून, गुरुवारी निर्णय होईल, असे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले.
माजी संचालकांचा आज निर्णय
नऊ माजी संचालकांना निवडणूक लढविण्यासाठी अपात्र ठरविले होते. त्यानंतर पणन सहसंचालकांनीही त्यावर शिक्कामोर्तब केले. त्यातील चौघांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यावर आज, दि. २० एप्रिलला सकाळीच निर्णय अपेक्षित आहे. सुनावणी झाली नाही किंवा अपील फेटाळले तर ते निवडणूक रिंगणातून बाहेर पडतील.
बिनविरोधसाठी प्रयत्न : विलासराव जगताप
निवडणूक बिनविरोधसाठी रात्री उशिरा बैठकीत चर्चा करणार असून, बाजार समितीशी सर्व संबंधित घटकांना एकत्र घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे भाजपचे जतमधील माजी आमदार विलासराव जगताप यांनी सांगितले.
स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारांना संधी द्या : अजितराव घोरपडे
शिवसेनेचे नेते व जिल्हा बँकेचे संचालक अजितराव घोरपडे म्हणाले, समितीची मोठी आर्थिक उलाढाल आहे. सध्याच्या संचालकांनी गैरव्यवहार करून नुकसान केले आहे. यामुळे सर्वच पक्षांनी चांगल्या उमेदवारांना संधी दिली पाहिजे. जो पक्ष चांगल्या उमेदवारांना संधी देईल, त्याच पक्षाबरोबर आम्ही जाऊ.