सांगलीच्या बाजार समितीची बहात्तर वर्षांत अधोगतीच जादा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 03:31 PM2023-04-27T15:31:10+5:302023-04-27T15:31:33+5:30
राजकीय उदासीनतेचा फटका येथील बाजाराला बसला
सांगली : सांगलीबाजार समितीस ७२ वर्षे झाली असून या कालावधीत मूलभूत सुविधांसह उलाढाल वाढणे अपेक्षित होते. पण, खाबुगिरीमुळे येथील गूळ, हळद आणि बेदाण्याची बाजारपेठ जिल्ह्याबाहेर स्थलांतरित होत आहे. ५० टक्के उलाढालीवर परिणाम होऊनही त्याकडे बाजार समितीने गांभीर्याने लक्ष दिले नाही.
जवळपास पाऊणशे वर्षाच्या या काळात बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रात बऱ्याच गोष्टी करता आल्या असत्या, मात्र राजकीय उदासीनतेचा फटका येथील बाजाराला बसला. त्यामुळे यात ना शेतकऱ्याचे भले झाले, ना व्यापाऱ्यांचे. नियोजनशून्य कारभारामुळे अनेक तोटे सहन करावे लागले. बाजार समिती म्हणजे राजकारणाचा व खाबुगिरीचा अड्डाच बनल्याचे चित्र दिसून येत आहे.
व्यापारी मालामाल, शेतकरी कंगाल
हळद, बेदाणा आणि गुळाच्या सौद्यात तेजी-मंदी करून व्यापारी मालामाल होत आहेत. एखादा सौदा जादा रकमेचा काढून उर्वरित माल मातीमोल किमतीने खरेदी करून शेतकऱ्यांना त्यांनी कंगाल केले आहे. काही व्यापाऱ्यांनी लाखो रुपयांचा गंडा घालूनही बाजार समितीने त्याकडे लक्ष दिले नाही. मार्केट यार्ड बदनाम झाल्याबद्दल व्यापारी नाराज आहेत.
सांगलीतील शीतगृहाच्या जागेवर पाडले दुकानगाळे
विष्णूअण्णा फळ व कांदा-बटाटा मार्केटमध्ये शीतगृहाची सोय नसल्याने बाहेरच्या राज्यासह देशातील फळे सौद्यासाठी थेट येत नाही. शीतगृहाची जागा बाजार समिती संचालकांनी व्यापाऱ्यांच्या घशात घालून लाखो रुपयांचा मलिदा लाटल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.
पार्किंगचा प्रश्न कोण सोडविणार?
महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, मध्य प्रदेश, गुजरातमधून शेतमाल घेऊन रोज शेकडो वाहने मार्केट यार्डात येत असतात. या वाहनांसाठी पार्किंगची सुविधाही नाही. त्यामुळे बाजारात अस्ताव्यस्त वाहने लावली जातात.
संचालकांशी आर्थिक लागेबांधे असल्यामुळे ते व्यापाऱ्यांच्या गैरकारभाराला पाठीशी घालत आहेत. बाजार समितीत शेतकऱ्यांना मूलभूत सुविधा नाहीत. शेतकरी निवास संचालक आणि त्यांचे बगलबच्चे वापरत आहेत. ३६ कोटींच्या ठेवीवरही संचालकांनी डल्ला मारला आहे. - संजय कोले, शेतकरी संघटना सहकार आघाडी प्रमुख.