सांगली बनली तुंबईनगरी :शहरातील ३ हजार घरात पाणी शिरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 12:34 PM2020-10-16T12:34:04+5:302020-10-16T12:37:06+5:30
rain, sanglinews मुसळधार पावसामुळे शहर आणि उपनगरातील तीन हजार घरात पाण्याने वेढा दिला. शेकडो घरात पाणी शिरले. शहरातील प्रमुख रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीची कोंडी झाली. नैसर्गिक नाले तुंबल्याने उपनगरातील नागरिकांना पुरस्थितीचा अनुभव आला. महापौर गीता सुतार, आयुक्त नितीन कापडनीस यांच्यासह महापालिकेच्या यंत्रणेने पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना हाती घेतल्या होत्या.
सांगली : मुसळधार पावसामुळे शहर आणि उपनगरातील तीन हजार घरात पाण्याने वेढा दिला. शेकडो घरात पाणी शिरले. शहरातील प्रमुख रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीची कोंडी झाली. नैसर्गिक नाले तुंबल्याने उपनगरातील नागरिकांना पुरस्थितीचा अनुभव आला. महापौर गीता सुतार, आयुक्त नितीन कापडनीस यांच्यासह महापालिकेच्या यंत्रणेने पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना हाती घेतल्या होत्या.
दोन दिवसाच्या मुसळधार पावसाने शहरासह उपनगराची दैना उडाली होती. कुुपवाडचा चैत्रबन नाला तुंडुब भरून वाहत होता. त्यामुळे वारणाली, मंगलमूर्ती कॉलनी, आनंदनगर, तुळजाईनगर,ज्ञानेश्वर कॉलनी परिसरातील जवळपास १०० हून अधिक घरे पाण्यामध्ये होती.
लक्ष्मीमंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी वाहत होते. काही काळ या रस्त्यावरील वाहतुक बंद करण्यात आली होती. शिंदे मळा येथील रेल्वे पुलाखाली तर गुडघाभर पाणी होते. मिरा हौसिंग सोसायटीतही पावसाचे पाणी शिरले होते. बायपास रस्ता ते मल्टीपेक्सकडे जाणाऱ्या रस्ता वाहतुकीसाठी बंद होता.
शामरावनगर परिसरातील अनमोल कॉलनी, देवेंद्र सोसायटी, महसूल कॉलनी, आदित्य कॉलनी, जनता बँक कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनी, रॉयल कॉलनी, सिद्धिविनायक कॉलनी, कालिकानगर, रुक्मिणीनगर परिसरातील १५०० घरांमध्ये पाणी शिरले आहे. नगरसेवक अभिजित भोसले, नसिमा नाईक, रज्जाक नाईक, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संदीप दळवी आदी नागरिकांच्या मदतीला धावले होते.
भोसले यांनी आयुक्त नितीन कापडनीस यांच्यासमोर परिस्थितीचा पंचनामा केला. वालनेसवाडी, गव्हर्मेंट कॉलनी, विजयनगर पुलासह अनेक भागात पाणी तुंंबल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले होते. जुना बुधगाव रस्ता, पंचशीलनगर, शिंदे मळा, रेपे प्लॉट, वाल्मिकीमध्ये आवास परिसरातील घरांना पाण्याने वेढा दिला होता.
पाण्याखालील परिसर, कॉलनी
शामरावनगर, सह्याद्रीनगर, शिंदे मळा, भीमनगर, मीरा हौसिंग सोसायटी, तुळजाईनगर, वारणाली, हडको कॉलनी, कालिकानगर, शांतीनाथ कॉलनी
पाण्याखालील रस्ते :- बायपास ते मल्टीपेक्स, रेल्वे पुल ते अहिल्यादेवी होळकर चौक, लक्ष्मी मंदिर ते विश्रामबाग उड्डाणपुल, शामरावनगरमधील बहुतांश रस्ते, मंगळवार बाजार ते अहिल्यादेवी होळकर चौक