सांगलीत भाजपचे महापालिकेसमोर चटणी-भाकर आंदोलन
By अविनाश कोळी | Published: June 24, 2024 05:58 PM2024-06-24T17:58:31+5:302024-06-24T18:06:53+5:30
चक्काजामचा इशारा: घंटागाडी चालकांची लूट केल्याप्रकरणी निदर्शने
सांगली : महापालिकेच्या घंटागाडीवर चालक म्हणून काम करणाऱ्या खासगी कंत्राटी कामगारांची ठेकेदाराकडून लूट केली जात आहे. त्यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी भाजप किसान मोर्चाच्या वतीने महापालिकेसमोर चटणी-भाकर आंदोलन करण्यात आले.मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले.
सकाळी साडे अकरा वाजता कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर धडक मारली. याठिकाणी निदर्शने करण्यात आली. त्यानंतर चटणी, भाकरी खाऊन कामगारांच्या पिळवणुकीबद्दल निषेध व्यक्त केला.
यावेळी पृथ्वीराज पवार म्हणाले की, घंटागाडीवर चालकांचा पुरवठा करणाऱ्या आदम्स कंपनीचा व्यवहार अत्यंत बेकायदेशीर आहे. वाहन चालक म्हणून काम करणाऱ्या कामगारांची अत्यंत बिकट परिस्थिती असतानाही त्यांच्याकडून दरमहा ५००० रुपये पगारातून काढून घेतले जात आहे. त्यांची कष्टाची भाकरी हिसकावून घेण्याचा हा प्रकार सुरु आहे. ज्यांनी पैसै देण्यास विरोध केला, त्यांना महापालिका प्रशासनाच्या मंजुरीविना कोणतेही कारण न देता कामावरून काढून टाकण्यात आले.
पवार म्हणाले की, वाहन चालक पुरवणाऱ्या आदम्स एंटरप्राईजेस या कंपनीने २०२२ पासून ९ वर्षासाठी महापालिकेच्या घंटागाडीवर वाहन चालक पुरविण्याचा ठेका मिळविला. त्यांनी सुमारे शंभर वाहन चालक विविध विभागाकरिता पुरविले. चालकांची नियुक्ती करताना प्रत्येक वाहन चालकाकडून ३० हजार रुपये अनामत रक्कम म्हणून भरून घेतली. अवास्तव ५० हजार ते दीड लाख रुपये महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आश्वासन देऊन घेण्यात येत आहेत. काही वाहन चालकांनी ही रक्कम भरली. ज्यांची पैसे देण्याची ऐपत नाही त्यांना कामावरुन काढून टाकण्यात आले. या सर्व गोष्टींचा आम्ही निषेध करीत आहोत.
करमुक्त पार्किंग जागेचे उद्घाटन
महापालिकेने पार्किंगच्या जागांना कर लावल्यामुळे त्याचा निषेध म्हणून आंदोलकांनी महापालिकेच्या पार्किंग आवाराचे करमुक्त जागा म्हणून प्रतिकात्मक उद्घाटन केले.