सांगलीत भाजपच्या जिल्हा परिषद सदस्यांचे बंड; ...म्हणे अध्यक्ष बदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 11:47 PM2018-10-01T23:47:22+5:302018-10-01T23:47:28+5:30

Sangli, BJP's Zilla Parishad member rebelled; ... say change the president | सांगलीत भाजपच्या जिल्हा परिषद सदस्यांचे बंड; ...म्हणे अध्यक्ष बदला

सांगलीत भाजपच्या जिल्हा परिषद सदस्यांचे बंड; ...म्हणे अध्यक्ष बदला

Next

सांगली : गेल्या तीन महिन्यांपासून जिल्हा परिषदेत अध्यक्ष बदलाची मागणी करूनही त्याकडे नेत्यांचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ भाजपच्या जिल्हा परिषद सदस्यांनी सोमवारी बंड पुकारले. सदस्यांच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषदेत बदलाची मागणी केली.
भाजप आघाडीतील महाडिक गट, घोरपडे गट, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह २२ सदस्यांचा मागणीला पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला. अध्यक्ष बदलाबाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख नेत्यांना चुकीची माहिती देत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
भाजपचे जिल्हा परिषद सदस्य शिवाजी डोंगरे, प्रमोद शेंडगे, सुरेंद्र वाळवेकर, सरदार पाटील, मनोज मुंडगनूर, विद्या डोंगरे, शोभा कांबळे, सुरेखा बागेळी हे स्वत:, तर स्नेहलता जाधव, सुनीता पवार, प्राजक्ता कोरे, मंगल नामद यांचे पती बैठकीला उपस्थित होते.
जिल्हा परिषदेत परिवर्तन घडवून भाजपने सत्ता मिळविल्यानंतर अध्यक्षपदी संग्रामसिंह देशमुख यांना संधी देण्यात आली. त्यांना सव्वा वर्षे कालावधी देत इतरांना नंतर संधी देण्याचा निर्णय भाजपच्या नेत्यांनी घेतला होता. आता दीड वर्ष उलटून गेल्यानंतरही बदलाबाबत नेत्यांकडून निर्णय होत नसल्याने इच्छुक सदस्यांत अस्वस्थता होती. गेल्या महिन्यातही जत तालुक्यातील सदस्यांनी अध्यक्ष बदलाची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर सोमवारी या सदस्यांनी आक्रमक होत बंडाचा इशारा देत बदलाची मागणी केली.
शिवाजी डोंगरे म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करताना सव्वा वर्षाचा कालावधी देण्यात येणार असल्याचे सांगितले होते. आता इतरांना कामाची संधी मिळावी, यासाठी पदाधिकारी बदल करण्यात यावा. खासदार संजयकाका पाटील आणि जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्याकडे मागणी केली होती. त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे मागणी केली असता, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. याबाबत आम्ही मुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांची भेट घेणार असून, नेत्यांकडून निर्णय न झाल्यास राजकीय भूकंप घडविणार आहोत.
महाडिक, घोरपडे, ‘स्वाभिमानी’चा पाठिंबा
यावेळी उपस्थित सदस्यांनी सांगितले की, सत्ताधारी भाजप आघाडीमधील रयत विकास आघाडीच्या महाडिक गटाचे जगन्नाथ माळी, मीनाज मुलाणी, माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या गटातील संगीता नलवडे आणि आशा पाटील, तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सुरेखा आडमुठे यांनीही पदाधिकारी बदलाबाबत सहमती दर्शविली आहे.
एकासाठी विधानसभेच्या
पाच जागा धोक्यात
डोंगरे म्हणाले की, संग्रामसिंह देशमुख यांना पलूस-कडेगाव मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवायची आहे. त्यासाठी त्यांना अध्यक्षपद हवे आहे. त्यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी आमच्यावर अन्याय होत आहे. सदस्यांच्या नाराजीमुळे विधानसभेच्या एका जागेसाठी पाच विधानसभा मतदारसंघ धोक्यात आले आहेत.
जिल्हाध्यक्षांकडून चुकीची माहिती
भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख हे महाडिक व घोरपडे गट आपल्यासोबत आहेत, असे वरिष्ठ नेत्यांना सांगत आहेत. आठवड्यातील पाच दिवस मुंबईत थांबून नेत्यांच्या कानात उलटसुलट सांगायचे काम त्यांच्याकडून सुरू असल्याचा आरोप डोंगरे यांनी केला.
बलाबल असे
भाजप २५
राष्ट्रवादी १४
काँग्रेस १०
रयत आघाडी ४
शिवसेना ३
घोरपडे गट २
अपक्ष १
स्वाभिमानी १

Web Title: Sangli, BJP's Zilla Parishad member rebelled; ... say change the president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.