फटाक्यांच्या आतषबाजीत उजळली सांगली
By admin | Published: October 30, 2016 11:37 PM2016-10-30T23:37:06+5:302016-10-30T23:37:06+5:30
बाजारपेठेत दिवसभर गर्दी : पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन; उत्सवाच्या उत्साहाला उधाण
सांगली : उत्सवाच्या निमित्ताने उत्साहाला आलेले उधाण... लक्ष दिव्यांनी लख्ख प्रकाशात उजळलेले शहर... रांगोळी, फुले आदी साहित्यांनी केलेली आरास आणि भक्तिमय वातावरणात रविवारी सांगलीत पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन करण्यात आले. घरोघरी तसेच व्यापारी पेठांमध्ये सायंकाळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली.
दीपावलीतील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. रविवारी जिल्ह्यासह शहरात दिवसभर लक्ष्मीपूजनाची तयारी सुरू होती. कुटुंबासह व्यवसायात स्थिरता, आर्थिक स्थैर्य देणाऱ्या लक्ष्मीचा वरदहस्त कायम राहावा, या प्रार्थनेसह जोरदार आतषबाजी करत शहरात रविवारी सायंकाळी लक्ष्मी पूजन उत्साहात पार पडले. लक्ष्मी पूजनावेळी दिव्यांचा झगमगाट, फुलांचा सुवास, उदबत्तीचा घमघमाट याने वातावरण प्रसन्न झाले होते. खास दिवाळीसाठी खरेदी केलेले नवीन कपडे, दागिने घालून घराघरांत नागरिक सजले होते. यावेळी घरातील सोने, चांदी, पैशाचीही पूजा करण्यात आली. लक्ष्मी पूजनादिवशी केरसुणीला लक्ष्मीचेच स्थान दिले जाते. त्यामुळे आज त्याचीही खरेदी करण्यात आली. अनेकांची दिवाळी खरेदी आधीच झाली असली, तरी आजही खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी नव्हती. आजच्या खरेदीत आयत्या वेळची धावपळ जाणवत होती.
व्यावसायिकांनी लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी दारावर लावलेल्या फुलांच्या तोरणांमुळे भक्तिमय वातावरण तयार झाले होते. त्यातच दीपमाळांचा झगमगाट सणाच्या आनंदाला अधिक बळ देत होता. सायंकाळी दुकानदारांनी दुकानात पूजा केली. रात्री आठच्या सुमारास घराघरांत, दुकानात पूजन झाले. त्यानंतर जोरदार आतषबाजीने उत्सव साजरा करण्यात आला.
शहरात विशेषत: व्यावसायिकांनी लक्ष्मी पूजनानिमित्त दुकानांना आकर्षक सजावट केली होती. कुटुंबातील सर्वांनी एकत्र येत फटाके उडविण्याचा आनंद घेतला. अंगण नाही, तेथे रस्त्यावरच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. शहरात रात्री उशिरापर्यंत फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. यामुळे आसमंत उजळून निघाला होता. (प्रतिनिधी)