Sangli: गुंठाभर जागेच्या वादातून महिलेची निर्घृण हत्या, धारधार हत्याराने केले २० वार, ५ संशयित ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2023 09:47 PM2023-04-09T21:47:46+5:302023-04-09T21:48:54+5:30
Sangli: सांगली : शहरातील वानलेवाडी परिसरात घरजागेच्या वादातून कोयत्यासह धारदार शस्त्राने वीस वार करून महिलेचा निर्घृण खून करण्यात आला.
सांगली : शहरातील वानलेवाडी परिसरात घरजागेच्या वादातून कोयत्यासह धारदार शस्त्राने वीस वार करून महिलेचा निर्घृण खून करण्यात आला. संगीता राजाराम मासाळ (वय ५०, रा. गल्ली क्रमांक ८, वानलेसवाडी, सांगली), असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी तीन अल्पवयीनांसह शिवाजी बाळू मासाळ, लक्ष्मी बाळू मासाळ (सर्व रा. वानलेसवाडी) या माय-लेकांना ताब्यात घेतले आहे. विश्रामबाग पोलिसांत घटनेची नोंद असून, रविवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मृत संगीता व संशयित हे एकमेकांच्या भावकीतील आहेत. संगीता यांचे पती राजाराम मासाळ यांचे दहा वर्षांपूर्वी निधन झाले आहे. सुमारे ३५ वर्षांपूर्वी राजाराम मासाळ यांच्यासह त्यांचे भाऊ चंद्रकांत, शिवाजी आणि बाळू या चौघांनी मिळून वानलेसवाडी येथे आठ गुंठे जागा खरेदी केली होती. त्या जागेपैकी चंद्रकांत मासाळ यांच्या नावावरील एक गुंठे जागा २००१ मध्ये राजाराम यांना विकली होती. त्यानंतर ही जागा परत मागण्यात आल्याने त्यांच्यात वाद सुरू झाला होता.
२०११ मध्ये राजाराम यांचा मृत्यू झाल्यानंतर मृत संगीता यांनी ही जागा अन्य एकाला विकली. त्या व्यक्तीने बांधकाम सुरू केल्यानंतर चंद्रकांत यांनी न्यायालयात धाव घेत २०१५ मध्ये बांधकामास स्थगिती मिळवली होती. चंद्रकांत यांचा सांभाळ करू, पण ही जागा परत घ्या यासाठी संशयित लक्ष्मी हिने तगादा लावला होता. यावरून मृत संगीता आणि संशयितांमध्ये वारंवार वादावादी होत होती.
रविवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास संगीता घरी जेवण करत बसल्या असताना, संशयित घरात घुसले व त्यांनी वादावादी सुरू करत कोयता व अन्य धारदार हत्याराने त्यांच्यावर वार केले. तब्बल वीस वार करण्यात आल्याने संगीता यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर संशयितांना ताब्यात घेण्यात आले. मृत संगीता यांचे भाऊ रावसाहेब गणपती गडदे (रा. गल्ली क्रमांक ९, गजराज कॉलनी, वानलेसवाडी, सांगली) यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली आहे.
संशयितांची हत्यारे नाचवित दहशत
संशयितांचा मृत संगिता यांच्यासोबत जागेच्या वाद सुरू होता. यातून त्यांच्यात वारंवार वादावादी होत होती. रविवारी दुपारी संशयितांनी संगिता यांच्या घरात घुसून त्यांचा खून केल्यानंतर मदतीला कोणी येवू नये म्हणून संशयितांनी हातातील धारदार हत्यारे नाचवून दहशत माजवत तिथून पळ काढला.
एक गुंठे जागेवरून प्रकार
मृत संगिता व संशयितांमध्ये जागेवरून वाद सुरू होता. हा वाद न्यायप्रविष्ठ आहे. संशयित हे मृत संगिता यांचा पुतण्या तर महिला जावू आहे. तरीही त्यांच्यात वाद होत असत. याच वादाचे पर्यावसन रविवारी खूनात झाले. केवळ एक गुंठे जागेच्या वादातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.