सांगलीच्या सुपुत्राने जिंकली अमेरीकेच्या ॲटलांटामधील क्रिकेट लिग, देशभरात प्रसिद्ध आहे लीग
By संतोष भिसे | Published: October 3, 2022 04:59 PM2022-10-03T16:59:20+5:302022-10-03T17:00:02+5:30
लीगमध्ये जगभरातील दहाहून अधिक देशांमधील १०० संघांनी सहभाग घेतला होता,
सांगली : अमेरिकेतील ॲटलांटा येथील प्रतिष्ठेची क्रिकेट लीग स्पर्धा कळंबी (ता. मिरज) येथील अंकुर माळी याच्या संघाने जिंकली. अंकुरने आपल्या कुशल कर्णधारपदाने शार्कस संघाला यशोशिखरापर्यंत पोहोचविले.
लीगमध्ये जगभरातील दहाहून अधिक देशांमधील १०० संघांनी सहभाग घेतला होता, त्यामुळे सामने अत्यंत चुरशीने झाले. दरवर्षी या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत बाजी मारण्यासाठी अनेक नाणावलेल्या संघांमध्ये संघर्ष रंगतो. अटलांटा क्रिकेट लीग अमेरिकेतील जिंकण्यासाठीची सर्वात कठीण क्रिकेट स्पर्धा मानली जाते. तेथे क्रिकेटचा खेळ फारसा लोकप्रिय नसला, तरी ही लीग स्पर्धा देशभरात प्रसिद्ध आहे. ती पाहण्यासाठी व क्रिकेटचा आनंद संपूर्ण अमेरीका खंडातील क्रिकेट रसिक गर्दी करतात. अशा प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील विजेत्या संघाचे कर्णधारपद भूषविण्याचा मान सांगलीच्या सुपुत्राला मिळाला.
त्याची शार्कस टीम गेली चार वर्षे उपांत्य फेरीपर्यंत पोहोचत होती, पण प्रत्येकवेळी विजयश्री हुलकावणी देत होती. यावर्षी मात्र संघाने चषक जिंकण्यात यश मिळविले. त्याच्या शार्कस संघात महाराष्ट्रासह, तामिळनाडू, केरळ, वेस्ट इंडिज, पुद्दुचेरी येथील खेळाडू सहभागी होते. अंकुरने शिवाजी विद्यापीठातून संगणकशास्त्रातून बीईचे शिक्षण पूर्ण केले आहे.