दिवाळीसाठी सांगली सजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 11:10 PM2018-11-04T23:10:59+5:302018-11-04T23:11:02+5:30
सांगली : मांगल्य आणि उत्साहाचे लेणे लेऊन दारात आलेल्या दिवाळीच्या सणाचा आनंद लुटण्यासाठी सांगली नगरी सजली आहे. घरोघरी अजूनही ...
सांगली : मांगल्य आणि उत्साहाचे लेणे लेऊन दारात आलेल्या दिवाळीच्या सणाचा आनंद लुटण्यासाठी सांगली नगरी सजली आहे. घरोघरी अजूनही सणाची लगबग दिसत आहे. वसुबारसने रविवारपासून दीपोत्सवास सुरुवात झाली असली तरी, मंगळवारी नरकचतुदर्शीपासून दिवाळीचा थाट सुरू होणार आहे.
सोमवारी ५ नोव्हेंबर रोजी दिवाळीतील धनत्रयोदशी हा एक महत्त्वाचा दिवस आहे. यादिवशी लक्ष्मीचे पूजन केले जाते. व्यापारी वर्गासाठीही हा महत्त्वाचा दिवस आहे. रोजमेळ व हिशेबाच्या नव्या वह्यांची सुरुवात धनत्रयोदशीच्या वहीपूजनानेच केली जाते. यादिवशी कणकीचे दिवे दक्षिणामुखी करून ठेवले जातात. त्यास यमदीपदान असेही म्हटले जाते. तसेच धन्वंतरी जयंती म्हणून या दिवशी धन्वंतरीचे पूजन केले जाते. त्यामुळे विविधांगाने या दिवसाला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे धनत्रयोदशीची पूर्वतयारी रविवारी बाजारात सुरू होती. नव्या वह्यांची खरेदीही केली जात होती. सांगलीच्या प्रमुख बाजारपेठांमधील व्यापारी त्याच्या तयारीत व्यस्त दिसत होते.
दिवाळीसाठी आता सांगली सज्ज झाली आहे. आकाशकंदील, पणत्यांच्या प्रकाशात हा सण उजळणार असून, त्याची लगबगही रविवारी घरोघरी सुरू होती. दारोदारी सडा, रांगोळी, दिव्यांचा प्रकाश आणि फुलांच्या माळांनी पूजेला बहर येणार आहे. कितीही अडचणी आल्या तरीही, या मांगल्याच्या सणाचे स्वागत मनात उत्साह घेऊन करण्याची भारतीय परंपरा आहे. या परंपरेनुसार सर्वत्र तयारी झाली आहे.
बाजारपेठांमध्ये रविवारी सायंकाळी गर्दी झाली होती. रेडिमेड गारमेंटसह रस्त्यावर अगरबत्तीपासून उटणे, लक्ष्मीपूजनाची पुस्तके, पणत्या, आकाशकंदील, फराळाचे पदार्थ अशा साहित्याचे स्टॉल्स सजले आहेत. खरेदी अंतिम टप्प्यात आली असली तरी, अजूनही विद्युत माळा, पणत्यांची खरेदी होतच आहे. शहरात मुख्य बाजारपेठांसह उपनगरांतही सुगंधी उटणे, साबण, सुगंधित तेल आदींचे स्टॉल उभारले असून, यालाही ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे. सांगली शहराबरोबर, मिरज, कुपवाड शहरातही बाजारात ग्राहकांची गर्दी आहे.