सांगली : शाळा बंद केल्यास मुले गुलाम बनतील : राजू शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 09:14 PM2018-09-22T21:14:39+5:302018-09-22T21:17:29+5:30
शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाची गंगा घरोघरी नेली; पण आजचे सरकार २० हजार शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
सांगली : शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाची गंगा घरोघरी नेली; पण आजचे सरकार २० हजार शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. शाळा बंद केल्यास गरिबांची मुले गुलाम बनतील. शाळा बंद करून देशाला गुलामांची गरज भासविण्याचा उद्योग केला जात आहे, असा आरोप खा. राजू शेट्टी यांनी शनिवारी सांगलीत केला.
येथील माधवनगर रस्त्यावरील डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या हॉलमध्ये आयोजित केलेल्या ‘कर्मवीर भूषण’ पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार संजय पाटील, आमदार सुरेश खाडे, महापौर संगीता खोत, इंद्रजित देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
खा. शेट्टी म्हणाले की, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आयुष्यभर गोरगरीब, दीनदलितांची मुले शिकावीत, यासाठी अपार कष्ट घेतले. रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून गरीब मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. आजही त्यांनी उभा केलेल्या संस्थेत हजारो मुले शिक्षण घेत आहेत. आजचे सरकार २० हजार शाळांना कायमस्वरुपी कुलूप ठोकायला निघाले आहे. शाळा बंद झाल्या तर या देशात गरिबांच्या मुलांना शिक्षणच मिळणार नाही.
शिक्षणाअभावी त्यांच्या पोटी गुलामच जन्माला येतील. शाळा बंदीचा सरकारचा हा निर्णय चुकीचा आहे.
हुतात्मा संकुलाचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांना ‘कर्मवीर विद्याभूषण’पुरस्कार, सागर वडगावे यांना ‘कर्मवीर उद्योगभूषण’ पुरस्कार, तर डॉ. भालचंद्र शिरगावे यांना ‘कर्मवीर कृषीभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. खा. पाटील, आ. खाडे व महापौर खोत यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रमुख पाहुण्यांच्याहस्ते दीपप्रज्वनल करून पुरस्कार प्रदान कार्यक्रमास प्रारंभ झाला. कर्मवीर पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ. एन. डी. पाटील यांनी स्वागत केले. प्रा. एन. डी. बिरनाळे यांनी सूत्रसंचालन केले. कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी ट्रस्टविषयी माहिती दिली. यावेळी मूकबधिर मुलांच्या शाळेला संगणक प्रदान करण्यात आला. कर्मवीर पतसंस्थेचे संचालक ए. के. चौगुले यांनी आभार मानले.
शाळा बंदच्या निर्णयास विरोध
शेट्टी म्हणाले, फुले-शाहू-आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात कर्मवीर अण्णांचे एक टक्का जरी गुण आचरणात आणण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा वैचारिक वारसा चालवत असल्याचे समाधान मिळेल. शाळा बंदच्या निर्णयास विरोध केला जाईल. गरिबांची मुलांना शिक्षण देण्याची जबाबदारी सरकारचीच आहे.