सांगली, मिरजेत चर्चना रोषणाईचा साज, नाताळ सणाची तयारी -धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 12:32 AM2017-12-24T00:32:54+5:302017-12-24T00:36:40+5:30
मिरज : मिरजेत नाताळनिमित्त शहरातील विविध चर्चमध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सोमवारी विशेष प्रार्थना सभा, ख्रिस्त जन्म संदेशासह व विविध स्पर्धा,
मिरज : मिरजेत नाताळनिमित्त शहरातील विविध चर्चमध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सोमवारी विशेष प्रार्थना सभा, ख्रिस्त जन्म संदेशासह व विविध स्पर्धा, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
मिरजेत नाताळ मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. नाताळनिमित्त मिरज ख्रिश्चन चर्च, रोझरी चर्च, अल्फोन्सा चर्च, सेंटपिटर तेलगू चर्च यासह शहरातील विविध चर्चच्या इमारतीवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सोमवारी विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. वॉन्लेस हॉस्पिटलमध्ये नाताळनिमित्त फनफेअर विविध स्पर्धा पार पडल्या. ख्रिश्चन महिला मंडळातर्फे गरीब व गरजूंना कपडे वाटप करण्यात आले.
मिरज ख्रिश्चन चर्चमध्ये सोमवार, दि. २५ रोजी ख्रिस्त जन्म उपासना नाताळनिमित्त रेव्ह. बी. जे. मोरे ख्रिस्त जन्माचा संदेश देणार आहेत. विविध चर्चमध्ये ख्रिस्ती धर्मगुरूंच्या उपस्थितीत उपासना सभा व विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. इस्त्राईलनगर, कमान वेस, वानलेसवाडी, बेथेलहेमनगर येथे रोषणाई करण्यात आली आहे. नाताळसाठी विविध शोभेच्या वस्तूंनी ख्रिसमस ट्री सजविण्यात आले आहेत. भेटवस्तू व शुभेच्छा पत्रे बाजारात आली आहेत.
नाताळ व नववर्षानिमित्त दि. ३१ पर्यंत धार्मिक गीत गायन स्पर्धा, ख्रिस्त जन्माची नाटिका, सजावट, रांगोळी स्पर्धा असे विविध कार्यक्रम होणार आहेत. १८९५ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या मंगळवार पेठेतील मिरज ख्रिश्चन चर्चमध्ये नाताळनिमित्त भजन स्पर्धा, गरजूंना विविध भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.
चर्चच्या १२२ व्या वाढदिवसानिमित्त चर्चमध्ये १५ वर्षे सेवा करणाºया रेव्ह. पी. जे. बावडेकर यांचा सत्कार करण्यात आला. दि. ३१ रोजी रात्री नवीन वर्षाच्या स्वागतासाठी फेरी व कँडल लाईट सर्व्हिस कार्यक्रम होणार आहे. दि. १ जानेवारी रोजी सकाळी रेव्ह. श्रीनिवास चोपडे यांच्या अधिपत्याखाली प्रार्थना व नूतन वर्षाची उपासना होणार आहे.
सांगलीत विद्युत रोषणाईने चर्च उजळले...
सांगलीतही ख्रिसमसची जय्यत तयारी सुरू झाली आहे. येथील बालाजी चौक व राम मंदिरजवळील केसीसी चर्चच्या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. केसीसी चर्चला आकर्षक विद्युत रोषणाईचा साज चढविला आहे. नाताळ सण अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपल्याने कार्यक्रमाच्या तयारीला वेग आला आहे.