सांगली ‘सीआयडी’च्या खांद्यावर चौकशांचा भार..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 01:07 AM2018-05-27T01:07:31+5:302018-05-27T01:07:31+5:30
येथील ‘सीआयडी’ विभागावर एकापाठोपाठ एक चौकशांचा भार टाकला जात असल्याने हा विभाग गेल्या काही दिवसात चर्चेत आला आहे. पोलीस कोठडीत
सांगली : येथील ‘सीआयडी’ विभागावर एकापाठोपाठ एक चौकशांचा भार टाकला जात असल्याने हा विभाग गेल्या काही दिवसात चर्चेत आला आहे. पोलीस कोठडीत अनिकेत कोथळे खुनाचा तपास नुकताच पूर्ण करून सुटकेचा नि:श्वास सोडत असतानाच तासगावची मारामारी आणि गळवेवाडी (ता. आटपाडी) येथील बालिकेवरील अत्याचार व खून प्रकरणाचा तपास त्यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
रिसाला रस्त्यावर पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ सांगलीचे सीआयडी कार्यालय आहे.
पोलीस उपअधीक्षक व कर्मचारी यांच्यासाठी काम करण्यास दोन स्वतंत्र खोल्या आहेत. मोजक्याच अधिकारी व कर्मचाऱ्यांवर त्यांना नेहमी काम करावे लागते. दिमतीला एक मोडकीतोडकी गाडी आहे. प्रवेशद्वाराजवळ अजूनही ‘सीआयडी’चे कार्यालय म्हणून पत्र्याचा फलक आहे. कार्यालयाची दुरवस्था झाली आहे. हे सीआयडीचे कार्यालय आहे, असे कोणीच म्हणणार नाही. अत्यंत गुंतागुंत, आव्हानात्मक व समाजात चर्चेत राहिलेली जिल्ह्यातील प्रकरणे त्यांच्याकडे तपासासाठी येत आहेत. सध्याचा कामाचा भार पाहिला तर, शासनाकडून त्यांना म्हणाव्या तशा सोयी-सुविधांची मदत मिळत नाही. आहे त्या परिस्थितीत ते गाडा ढकलण्याचे काम करीत आहेत.
एखाद्या गुन्ह्याचा वर्षानुवर्षे तपास करणारी ही यंत्रणा म्हणून अजूनही ‘सीआयडी’वर शिक्का आहे; पण तपासातील अनेक बारकाव्यांचा शोध घेऊन मुळापर्यंत जाण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. बहुचर्चित १९९४ मधील शालेय पोषण आहाराचा तपास सीआयडीने केला होता. त्यावेळी हा विभाग चर्चेत होता; पण हा तपास पूर्ण झाल्यानंतर सीआयडी विभाग पडद्याआड गेला. त्यानंतर अपवाद वगळता कोणत्याही गंभीर गुन्ह्याचा तपास त्यांच्याकडे गेला नाही. त्यामुळे सायंकाळी पाच वाजले की कार्यालय बंद होत असे. रविवारीही कार्यालय बंद ठेवून अधिकारी व कर्मचारी सुटी घेत होते. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत अनिकेत कोथळेचा झालेल्या खुनाचा तपास आल्यानंतर ‘सीआयडी’ विभाग चांगलाच चर्चेत आला. तेव्हापासून सीआयडीच्या कार्यालयात गजबज सुरू झाली. परिसराची स्वच्छता झाली. पिण्याच्या पाण्याच्या नळाला पाणीही येऊ लागले. २४ तास कार्यालयास स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त लागला.
गुन्ह्यांच्या फायलींचा ढीग
अनिकेत कोथळे खून प्रकरणानंतर अनेक गंभीर गुन्ह्यांच्या चौकशीचा भार सीआयडीच्या खांद्यावर टाकण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी व त्यांची ‘टीम’ सातत्याने तपासातच गुरफटत राहत आहे. कधी-काळी तीन-चार वर्षातून एखादा तपास त्यांच्याकडे येत असे. पण गेल्या काही महिन्यात ही परिस्थिती बदलल्याने सांगलीचा सीआयडी विभाग सध्या ‘सुसाट’आहे. जत तालुक्यातील दोन गुन्ह्यांचा तपास प्रलंबित असतानाच वारणानगर (जि. कोल्हापूर) येथील पोलिसांनी सव्वानऊ कोटींच्या रकमेवर मारलेल्या डल्ला प्रकरणाचा तपास काही मुद्द्यावर करण्याची जबाबदारी पडली होती. तोपर्यंत कोथळे प्रकरण घडले. गेल्या महिन्याभरात तर तासगाव मारामारी व गळवेवाडीतील बालिका अत्याचार व खुनाचा तपास आला आहे.
सध्याचे सुरू असलेले तपास
संख (ता. जत) येथील पोलीस चौकीतील संशयिताचा मृत्यू.
उमदी ठाण्यातील संशयिताची आत्महत्या.सांगली शहर पोलीस ठाण्यात कोठडीत अनिकेत कोथळेचा खून. तासगाव नगरपालिकेच्या पोटनिवडणुकीवेळची मारामारी.गळवेवाडी (ता. आटपाडी) येथील बालिकेचा अत्याचार करून खून.वारणानगर (जि. कोल्हापूर) पोलिसांनी लंपास केलेली सव्वानऊ कोटींची रोकड.