सांगली : भारतनगरचे नागरिक स्थायीच्या सभेत घुसले; पाण्यासाठी अधिकारी धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 11:02 AM2018-05-23T11:02:14+5:302018-05-23T11:02:14+5:30
सांगली शहरातील भारतनगर परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून पाण्याचा ठणठणाट आहे. महापालिकेकडे वारंवार तक्रार करून पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी मंगळवारी स्थायी समितीच्या सभेत घुसून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पाणी देणार नसाल तर बिले कशाला देता? असा सवालही त्यांनी केला.
सांगली : शहरातील भारतनगर परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून पाण्याचा ठणठणाट आहे. महापालिकेकडे वारंवार तक्रार करून पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी मंगळवारी स्थायी समितीच्या सभेत घुसून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पाणी देणार नसाल तर बिले कशाला देता? असा सवालही त्यांनी केला.
स्थायी सभापती बसवेश्वर सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा सुरू होती. दुपारी साडेबारा वाजता भारतनगरमधील नागरिक, महिला पाण्याचा नियमित पुरवठा करावा, यासाठी महापालिकेत आल्या. त्यांनी थेट स्थायी समितीचे सभागृहच गाठले. सभापती सातपुते, उपायुक्त सुनील पवार यांच्यासह सदस्यांसमोर नागरिकांनी गाऱ्हाणे मांडले.
भारतनगरला तीन महिन्यांपासून अपुरे, अनियमित व कमीदाबाने पाणी येते. याबाबत तक्रारी केल्यानंतर पाणीपुरवठा विभागाकडून एखादा दिवस नियोजन होते, पुन्हा तीच परिस्थिती कायम आहे. नदीत मुबलक पाणी आहे, मग पाणी कुठे मुरते? तुमच्या नियोजनातच घोळ असल्याचा आरोप महिलांनी केला.
यावेळी सदस्य शिवराज बोळाज यांनीही पाणीपुरवठा विभागाचे अभियंता शीतलनाथ उपाध्ये यांना जाब विचारला. त्यानंतर मागासवर्गीय समितीच्या कार्यालयात नागरिक, नगरसेवक व उपाध्ये यांची बैठक झाली.
उपाध्ये यांनी बुधवारी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देत आंदोलकांना शांत केले. परंतु नागरिकांनी जर पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर बिलांवर बहिष्कार घालू, असा पवित्रा घेतला. त्यानंतर नागरिक व महिलांनी महापौर हारुण शिकलगार यांची भेट घेतली.
जर पाणी मिळत नसेल तर पाणीबिले पाठविणेच बंद करावे. आतापर्यंत आलेली बिले माफ करावीत, अशी मागणी केली.