सांगली : हवामानाच्या लहरीपणाने नागरिक हैराण, पारा १२ अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 01:14 PM2018-12-11T13:14:05+5:302018-12-11T13:15:59+5:30
कधी उकाडा, कधी कडाक्याची थंडी, कधी ढगाळ वातावरण तर कधी पावसाचा शिडकावा अशा हवामानाच्या लहरीपणाचा फटका सांगली जिल्ह्यातील नागरिकांना शेतकऱ्यांना बसत आहे.
सांगली : कधी उकाडा, कधी कडाक्याची थंडी, कधी ढगाळ वातावरण तर कधी पावसाचा शिडकावा अशा हवामानाच्या लहरीपणाचा फटका सांगली जिल्ह्यातील नागरिकांना शेतकऱ्यांना बसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून उकाडा अनुभवणाऱ्या सांगलीकरांना मंगळवारपासून कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. अचानक किमान तापमान १२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे.
सोमवारी जिल्ह्याचे सरासरी किमान तापमान १७ अंश व कमाल तापमान ३१ अंश होते. मंगळवारी सकाळी अचानक ५ अंशाने तापमान खाली उतरत १२ अंश सेल्सिअस झाले. कमाल तापमानात फारसा फरक पडला नसला तरी सकाळपासून अचानक बोचऱ्या थंडीचा सामना नागरिकांना करावा लागला.
गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्याच्या हवामानात सातत्याने बदल होत आहेत. गेल्या दहा वर्षाच्या हवामानाचा इतिहास पाहिला तर सर्वाधिक लहरीपणा या वर्षातच अनुभवास येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर याचा विपरित परिणाम होत आहे. रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. लहान मुले आणि वयोवृद्धांच्या आरोग्याला हवामानाचा हा लहरीपणा कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येत आहे.
भारतीय हवामान खात्याने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार येत्या काही दिवसात तापमानात आणखी घट होणार आहे. १२ अंशापर्यंत खाली आलेले किमान तापमान आता १३ व १४ डिसेंबर रोजी ११ अंशापर्यंत तर १५ डिसेंबरनंतर १0 अंशापर्यंत खाली येईल, असा अंदाज आहे.
सरासरी कमाल तापमानही २९ अंशापर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सकाळी, रात्री आणि दुपारच्या वेळीही थंडी लोकांना जाणवणार आहे. त्यामुळे लोकांना आता उबदार कपड्याचा आधार घ्यावा लागणार आहे. सांगली जिल्ह्यातील हवामानाचा हा लहरीपणा आणखी बरेच रंग या पंधरवड्यात दाखविण्याची चिन्हे आहेत.
हलक्या पावसाची चिन्हे
सांगली जिल्ह्याच्या काही भागात १४ व १५ डिसेंबर रोजी तुरळक पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. या दोन्ही दिवशी हवामान ढगाळ राहण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. वातावरण ढगाळ राहिले तरी तापमानात काही फरक पडणार नसल्याचेही या विभागाने म्हटले आहे.