सांगली ‘सिव्हिल’मध्ये उपचार महागले! आजपासून अंमलबजावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 11:20 PM2018-04-02T23:20:23+5:302018-04-02T23:20:23+5:30
सांगली : गोरगरिबांचा आधार म्हणून पश्चिम महाराष्ट्रत लौकिक असलेल्या सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय (सिव्हिल) रुग्णालयातील उपचार महागले आहेत.
सचिन लाड ।
सांगली : गोरगरिबांचा आधार म्हणून पश्चिम महाराष्ट्रत लौकिक असलेल्या सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय (सिव्हिल) रुग्णालयातील उपचार महागले आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागाने उपचार खर्च वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी मंगळवार, दि. ३ एप्रिलपासून केली जाणार आहे. दहा ते पन्नास रुपयांपर्यंत ही वाढ केलेली आहे.
महागडे उपचार व अत्याधुनिक तपासणीची यंत्रणा बसविली जात असल्याने उपचाराच्या दरात वाढ केल्याची स्पष्टोक्ती वैद्यकीय शिक्षण विभागाने दिली आहे. पण मुळातच सिव्हिलमध्ये येणारे रुग्ण गरीब आहेत. मोफत उपचार केले जातात, असा विचार करून काहीजण दाखल होतात; पण आता केसपेपरपासून ते औषधोपचारापर्यंतच्या खर्चात दहा ते पन्नास रुपयांपर्यंत वाढ झाल्याने रुग्णांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. गेल्या दहा वर्षांत ही दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. दहा वर्षांपूर्वी पाच रुपये केसपेपर शुल्क होते. पाच वर्षांपूर्वी केलेल्या दरवाढीत केसपेपरचा दर दुप्पट करण्यात आला. आताच्या दरवाढीतच हा दर दुप्पटच केला आहे. खासगी रुग्णालयात उपचार महागडे असल्याने ते सर्वसामान्यांना परवडत नाही. त्यामुळे ते सिव्हिलचा आधार घेतात.
गेल्या काही वर्षांत सांगलीसह कोल्हापूर, सोलापूर व कर्नाटकातील रुग्ण येथे दाखल होत आहेत. दररोज किमान दीड हजारहून अधिक रुग्ण येतात. सकाळी आठ ते दुपारी एक या वेळेत बाह्यरुग्ण (ओपीडी) विभाग तुडूंब भरलेला असतो. तसेच नेहमी चारशे ते साडेचारशे रुग्ण वॉर्डात दाखल होऊन उपचार घेतात. रुग्णांची वाढती संख्या, त्यांच्यावरील उपचार खर्च आणि विविध तपासण्या करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री बसविली जात आहे. पण त्या तुलनेत उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागाने सर्वप्रकारच्या तपासण्या, उपचार, केसपेपर, ड्रेसिंग, आहार, अतिदक्षता विभाग, सर्वसाधारण वॉर्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र, फिटनेस प्रमाणपत्र, वयाचे दाखले आदी प्रकारात दर वाढविले आहेत.
समिती गठित
वैद्यकीय शिक्षण विभागाने उपचाराचे दर वाढविण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालयातील तज्ज डॉक्टरांची समिती गठित केली होती. तसेच नागपूर, औरंगाबाद व पुणे येथील शासकीय रुग्णालयात अधिष्ठातांकडून शिफारशी मागवून घेतल्या होत्या. सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्या अधिपत्याखाली येणाºया रुग्णालयातील दरात तफावत नको, असा विचार करून ही दरवाढ केली आहे. याची अंमलबजावणी येत्या ३ एप्रिलपासून राज्यात सर्व शासकीय रुग्णालयात केली जाणार आहे.
वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार मंगळवारपासून नवीन दरवाढीची अंमलबजावणी केली जाणार आहे. संबंधित विभागांना तसे आदेश दिले आहेत. किरकोळ स्वरुपाची ही दरवाढ आहे. दरवाढ केली जाणार असल्याचे गेल्या आठवड्यात जाहीर केले होते. रुग्णालयात तसा फलकही लावण्यात आला होता. - डॉ. नंदकिशोर गायकवाड, उपवैद्यकीय अधीक्षक, सिव्हिल, सांगली.