Sangli: पाऊस रुसल्याने शेतकऱ्यांमध्ये काळजीचे ढग गडद, जिल्ह्यात ४०.१९ टक्के पेरण्या
By अशोक डोंबाळे | Published: June 29, 2024 07:11 PM2024-06-29T19:11:33+5:302024-06-29T19:12:08+5:30
Sangli News: शेतशिवार पेरणीकरिता सज्ज असूनही मान्सून पावसाचा जोर नसल्यामुळे पेरणीला काहीसा ब्रेक लागला आहे. मृग नक्षत्रात पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरणीला सुरुवात झाली असून बघता-बघता जिल्ह्यात ४०.१९ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत.
- अशोक डोंबाळे
सांगली - शेतशिवार पेरणीकरिता सज्ज असूनही मान्सून पावसाचा जोर नसल्यामुळे पेरणीला काहीसा ब्रेक लागला आहे. मृग नक्षत्रात पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरणीला सुरुवात झाली असून बघता-बघता जिल्ह्यात ४०.१९ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. सद्या पाऊस रुसलेलाच असल्याने शेतकऱ्यांमध्ये आता काळजीचे ढग आणखीच गडद व्हायला लागले आहेत.
दरवेळी शेतकरी मृग नक्षत्राला सुरुवात झाली की, शेतकरी खरीप पेरणीच्या तयारीला लागतो. ७ जूनपासून मृग नक्षत्राला सुरुवात झाली असून हे नक्षत्र संपले. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, पलूस, कडेगाव, तासगाव, मिरज, वाळवा, शिराळा तालुक्याच्या काही भागात चांगला पाऊस झाला आहे. परंतु, काही ठिकाणी आजही पेरणीयोग्य पाऊस कोसळला नाही. आताही आकाशात ढगांची गर्दी होते. मात्र पावसाचा जोर नसल्याने दिवसागणिक शेतकऱ्यांची काळजी वाढत आहे. आता आर्द्रा नक्षत्र लागले असून यातील मोरही थुई थुईच नाचत आहेत, त्यालाही फारसा जोर नसतानाही शेतकऱ्यांनी पावसाच्या आशेवर ४०.१९ टक्के पेरण्या उरकल्या आहेत. जिल्ह्यात खरीप पेरणीचे सरासरी दोन लाख ५५ हजार ९८४.७४ हेक्टर क्षेत्र असून एक लाख दोन हजार ८७३.३० हेक्टरपर्यंत पेरण्या आटोपल्या असून यात भात, सोयाबीनची सर्वाधिक पेरणी झाली आहे. आता त्या पाठोपाठ कडधान्याच्या पेरणीलाही सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहे. पावसाने अशीच दडी मारल्यास दुबार पेरणीचे संकट अटळ आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत झालेली पेरणी
तालुका सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी
मिरज २४६७१.०५ १५४५.२० ७.५०
जत ७५२२० ५३२३५.४५ ६७.०७
खानापूर १६१०० २९११ १८
वाळवा २३१२२ १३६७६ ५९.७६
तासगाव ३३१२८ ६९६.७० २.१०
शिराळा २२६०५ १४६१८ ६४.१७
आटपाडी १०७५० ४२२६ ३९.३१
क.महांकाळ २१३७३ ५०८५ २३.७५
पलूस ६१०८.४ ७५० १२.२८
कडेगाव १९९१६ ५७२९ २८.७७
१ जूनपासून आतापर्यंतचा पाऊस
तालुका पाऊस (मिलीमीटर)
मिरज २१२.८
जत २१६
खानापूर २००.७
वाळवा २४१.४
तासगाव २४२.४
शिराळा २२५.३
आटपाडी १९७.७
कवठेमहांकाळ २५६.९
पलूस १९१.७
कडेगाव २१४
एकूण २२२.७