सांगलीचे आयुक्त भाजपचे हस्तक, राष्ट्रवादी नगरसेवकांचा आरोप, महापालिकेत गाजर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 04:08 PM2017-12-16T16:08:37+5:302017-12-16T16:15:51+5:30
आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे नगरसेवक पराभूत व्हावेत, या उद्देशाने भाजपच्या नेत्यांच्या सांगण्यानुसार आयुक्तांनी कामे अडविली आहे. सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचे आयुक्त हे भाजपचे हस्तक बनले आहेत, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी शनिवारी केला.
सांगली : आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे नगरसेवक पराभूत व्हावेत, या उद्देशाने भाजपच्या नेत्यांच्या सांगण्यानुसार आयुक्तांनी कामे अडविली आहे. सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचे आयुक्त हे भाजपचे हस्तक बनले आहेत, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी शनिवारी केला.
महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्याविरोधात गेल्या चार दिवसांपासून राष्ट्रवादीचे नगरसेवक महापालिकेतच आंदोलनास बसले आहेत. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा, भारतीय राज्यघटना, अधिनियमाची पुस्तिका यांचे पूजन केले. त्यानंतर गाजरांचा ढीग करून
आयुक्तांनी जनतेला दाखविलेले विकासाचे गाजर अशा आशयाचा फलकही झळकविला. आयुक्तांच्या निष्क्रीयतेच्या घोषणाही देण्यात आल्या.
यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज म्हणाले की, आयुक्तांच्या मागे भाजपची ताकद आहे, हे आता सिद्ध झाले आहे. आम्ही आयुक्तांविरोधात आंदोलन सुरू केल्यानंतर भाजपच्या नेत्यांना राग येण्याचे
कारण नव्हते. त्यांनी राग व्यक्त केल्यामुळे आम्ही व्यक्त केलेल्या संशयाला बळ मिळाले आहे.
संपूर्ण महापालिका इतिहासात आजपर्यंत कधी आयुक्तांचा वापर राजकारणासाठी झाला नाही. असा प्रकार आम्ही प्रथमच अनुभवत आहोत. आयुक्तांच्या विरोधात आम्हाला तीव्र आंदोलन करण्याची इच्छा नाही.
आमचे हे वैयक्तिक भांडण नाही. आयुक्तांच्या ताठर भूमिकेमुळे नागरिकांचे नुकसान होत असून नागरिक अडचणीत येत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना पुन्हा एकदा कामे मंजुर करण्याची विनंती करतो. ते असेच वागत राहिले, तर आम्हाला त्यांच्याविरोधात आंदोलन तीव्र करावेच लागेल.
नगरसेवक युवराज गायकवाड म्हणाले की, आयुक्त हे भाजपचे हस्तक आहेत, हे आता वेगळे सांगण्याची गरज नाही. भाजपच्या शहर उपाध्यक्षांनी आयुक्तांची बाजु घेतल्यामुळे ते सिद्ध झाले आहे. राष्ट्रवादी नगरसेवकांच्या प्रभागातील कामे झाली नाहीत, तर नागरिक त्यांना मतदान करणार नाहीत, असे गणित आयुक्तांनी व भाजप नेत्यांनी बांधले आहे.
त्यामुळे भाजपचे नेते ज्याप्रमाणे सांगतात, त्याप्रमाणे आयुक्त वागत आहेत. जाणीवपूर्वक कामे अडविली जात आहेत. आयुक्तांना इतकीच खुमखुमी असेल, तर त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा आणि महापालिकेच्या मैदानात उतरावे. जनता त्यांना धडा शिकवेल, असे ते म्हणाले.
आंदोलनात प्रा. पद्माकर जगदाळे, विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते, माजी स्थायी समिती सभापती संगीता हारगे, नगरसेवक राजू गवळी, अल्लाउद्दीन काझी,नगरसेविका अंजना कुंडले, प्रियंका बंडगर, आशा शिंदे, विष्णु माने, दिग्विजय सूर्यवंशी, माजी महापौर सुरेश पाटील, जमीर बागवान, अभिजीत हारगे आदी सहभागी झाले होते.
आयुक्त फिरकलेच नाहीत
राष्ट्रवादीचे आंदोलन चालू झाल्यापासून महापालिका आयुक्त खेबुडकर महापालिकेत फिरकलेच नाहीत. बंगल्यावर व शहरात ते फिरताना दिसतात, मात्र आंदोलनकर्त्यांशी बोलायला त्यांना वेळ नाही, अशी टीका बजाज यांनी यावेळी केली.