सांगलीत काँग्रेसचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:27 AM2021-01-23T04:27:44+5:302021-01-23T04:27:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा वेशीवर टांगणारे रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा वेशीवर टांगणारे रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने काँग्रेस कमिटीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. देशभक्ती आणि राष्ट्रवादाचे प्रमाणपत्र वाटणाऱ्यांचा खरा चेहरा आता समोर आला असल्याचा आरोप शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी भाजपवर केला.अर्णब गोस्वामी यांच्यावर कडक कारवाई व्हावी, यासाठी राज्यभर काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. सांगलीतही आंदोलन झाले. पृथ्वीराज पाटील म्हणाले, रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप संवादामध्ये अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत गोपनीय आणि संवेदनशील माहिती गोस्वामी यांच्याकडे कशी आली? यावरून गोस्वामी यांचे पंतप्रधान, गृहमंत्री व भाजप सरकारकडील मंत्र्यांशी निकटचे संबंध असल्याचे स्पष्ट होते. गोपनीयतेचा भंग करत हा देशद्रोहाचा प्रकार गोस्वामी यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. शिवाय भाजपने निवडणूक जिंकण्यासाठी शहीद जवानांच्या बलिदानाचा वापर केला आहे का? असा सवालही उपस्थित होत आहे.
या आंदोलनात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मालन मोहिते, मिरज तालुकाध्यक्ष अण्णासाहेब कोरे, नामदेवराव मोहिते, नगरसेवक फिरोज पठाण, बिपीन कदम, रवी खराडे, विजय आवळे, अण्णासाहेब पाटील, शीतल सदलगे, अशोकसिंह रजपूत, संतोष भोसले, आकाश शेंडे आदी काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.