सांगली :  दक्षिण भारत जैन सभेचे १६,१७ ला स्तवनिधी (निपाणी) येथे अधिवेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 13:23 IST2018-06-12T13:23:54+5:302018-06-12T13:23:54+5:30

दक्षिण भारत जैन सभेचे ९८ वे त्रैवार्षिक अधिवेशन यंदा स्तवनिधी (निपाणी) येथे १६ व १७ जून रोजी होत आहे.

Sangli: Convention at the South India Jain Sabha on 16,17, at Talvandi (Nippani) | सांगली :  दक्षिण भारत जैन सभेचे १६,१७ ला स्तवनिधी (निपाणी) येथे अधिवेशन

सांगली :  दक्षिण भारत जैन सभेचे १६,१७ ला स्तवनिधी (निपाणी) येथे अधिवेशन

ठळक मुद्देदक्षिण भारत जैन सभेचे स्तवनिधीला अधिवेशन विविध कार्यक्रम, पुरस्कार वितरण, स्मरणिका प्रकाशन

सांगली : दक्षिण भारत जैन सभेचे ९८ वे त्रैवार्षिक अधिवेशन यंदा स्तवनिधी (निपाणी) येथे १६ व १७ जून रोजी होत आहे.

यावेळी जैन महिला परिषद, पदवीधर संघटना, वीर सेव दल मध्यवर्ती समितीसह जैन सभेचे अधिवेशन, विविध पुरस्कार वितरण व स्मरणिका प्रकाशन आदि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सभेचे उपाध्यक्ष रावसाहेब पाटील, मुख्य महामंत्री डॉ. अजित पाटील, खजिनदार संजय शेटे यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत दिली.

ते म्हणाले की, ११९ वर्षापूर्वी स्तवनिधी येथे ३ एप्रिल १८९९ साली दक्षिण भारत जैन सभेची स्थापना झाली होती. त्याकाळी या भागातील जैन समाज सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला होता. या विषन्नावस्थेच्या काळात समाजधुरिणींनी सभेची स्थापना केली.

समाजाची गरज ओळखून तो शिक्षित व्हावा, यादृष्टीने पावले टाकली. आज कोल्हापूर, सांगली, बेळगाव, हुबळी, इचलकरंजी, कागल, औरंगाबाद येथे मुला-मुलींची वसतीगृहे आहेत. वीर सेवा दल या युवक संघटनेच्या माध्यमातून सुसंस्काराचे बीजारोपण केले जात आहे.

सभेचा कार्यविस्तारही सांगली, कोल्हापूर, मराठवाडा व उत्तर कर्नाटकातून आता मुंबई, कोकण, गोवा या भागातही झाला आहे. समाजप्रबोधनासह गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनाही सुरू केली आहे. समाजाचे सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व शैक्षणिक परिवर्तनाचे कार्य सभेच्या माध्यमातून सुरू आहे.


जैन सभेचे यंदा स्तवनिधी (जि. बेळगाव) येथे अधिवेशन होत आहे. शनिवार १६ रोजी स्वस्तिश्री डॉ. लक्ष्मीसेन भट्टारक स्वामाजी यांच्या पावन सानिध्यात धर्मध्वजारोहणाने होईल. प्रवेशद्वार, ब्रम्हनाथनगर व व्यासपीठ उद््घाटनानंतर सकाळी दहा वाजता जैन महिला परिषदेच्या अधिवेशनाला सुरूवात होईल.

या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी चांदणी आरवाडे असून नीलम माणगांवे स्वागताध्यक्षा आहेत. दुपारी साडेअकरा ते एक या वेळेत वीर महिला मंडळ समितीचे अधिवेशन होणार आहे. त्यानंतर दुपारी दोन ते साडेतीन पदवीधर संघटना व चार ते पाच या वेळेत वीर सेवा दल समितीचे अधिवेशन होईल.


रविवार १७ रोजी सकाळी साडेनऊ वाजता दक्षिण भारत जैन सभेची वार्षिक सर्वसाधरण सभा होणार आहे. या सभेत विविध ठराव करण्यात येतील. त्यानंतर दुपारी दोन वाजता विविध पुरस्कार व स्मरणिका प्रकाशनाचे आयोजन करण्यात आले आहे.


कर्नाटकचे मंत्री रमेश जारकीहोळ प्रमुख पाहुणे असून खा. राजू शेट्टी, खा. प्रकाश हुक्केरी, आ. शशिकल्ला जोल्ले, आ. अभय पाटील, खा. प्रभाकर कोरे, माजी अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील आहेत.

यावेळी आ. सतीश जारकीहोळ, उमेश कत्ती, गणेश हुक्केरी, पी. राजू, दुर्योधन ऐहोळे, महेश कुमटळ्ळी, श्रीमंत पाटील, प्रकाश आवाडे, प्रा. शरद पाटील, राजेंद्र पाटील यड्रावकर, गणपतराव पाटील, वैभव नायकवडी हेही उपस्थित राहणार आहेत.

मान्यवरांचा सत्कार

या कार्यक्रमात रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, प्रा. शिवाजी पाटील (वाळवा), शिवाजीराव पाटोळे, धनपाल हाबळे, आदिनाथ कुरूंदवाडे, श्रीपाल बोगार, अशोक घोरपडे, सुधाकर काशीद, डॉ. जयकांत बडबडे, भरत गाट, संविद्र पाटील, सारिका खुरपे, प्रमोद चौगुले, चंद्रकांत मेहता यांच्यासह वीराचार्य अल्पसंख्याक सौहार्द विविध उद्देशगळ सह. नि. बेडकिहाळ या संस्थेचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
 

Web Title: Sangli: Convention at the South India Jain Sabha on 16,17, at Talvandi (Nippani)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.