सांगली क्राईम न्यूज--मोटार पेटविली-महिलेचा विनयभंग; १७ तोळ्यांचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 08:19 PM2019-02-22T20:19:06+5:302019-02-22T20:30:34+5:30

येथील गणेशनगरमधील विशाल नारायण माळी यांची मोटार अज्ञातांनी पेटवून दिली, येथे एका ४२ वर्षीय महिलेस गेल्या दीड महिन्यापासून त्रास देऊन तिचा विनयभंग केल्याचा प्रकार गुरुवारी रात्री उघडकीस आला . येथील मुख्य बसस्थानकावर चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. प्रवासी महिलांना ‘टार्गेट’ करुन चोरटे त्यांच्या बॅगेतील दागिने हातोहात लंपास करीत आहेत.

Sangli Crime News - Motor Petwali - Molestation of Women; 17 pieces of lace jewelry | सांगली क्राईम न्यूज--मोटार पेटविली-महिलेचा विनयभंग; १७ तोळ्यांचे दागिने लंपास

सांगली क्राईम न्यूज--मोटार पेटविली-महिलेचा विनयभंग; १७ तोळ्यांचे दागिने लंपास

Next
ठळक मुद्देवृद्धेच्या अंगावर दुचाकी घालण्याचा प्रयत्नकर्नाळमधील घटना : दीड महिना त्रासचोरट्यांचा धुमाकूळ : मुख्य बसस्थानकातील दुसरी घटना

सांगलीत मोटार पेटविली  - गणेशनगरमधील घटना 
सांगली : येथील गणेशनगरमधील विशाल नारायण माळी यांची मोटार अज्ञातांनी पेटवून दिली. शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजता ही घटना उघडकीस आली. दुचाकी पेटविणारे संशयित दोन तरुण आहेत. त्यांनी माळी यांच्या शेजारील वृद्धेच्या अंगावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न केला. खोडसाळपणाने हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

माळी गणेशनगरमधील पहिल्या गल्लीत राहतात. त्यांचा फोटोग्राफी व व्हिडीओचा व्यवसाय आहे. गुरुवारी ते कुटुंबासह मोटारीने (क्र. एमएच १० सीए-८४०) परगावी गेले होते. रात्री उशिरा ते सांगलीत परतले. रात्री खूप उशीर झाल्याने त्यांनी बंगल्याच्या आतमध्ये मोटार घेतली नाही. गेटबाहेरच मोटार लावली. पहाटे साडेतीन वाजता त्यांच्या शेजारी राहणारी वृद्धा घराबाहेर झोपली होती. तिला अचानक जाग आली. त्यावेळी गेटबाहेर लावलेल्या मोटारीने पेट घेतल्याचे तिला दिसले. ती उठून मोटारीजवळ जाणार, तेवढ्यात दोन तरुण मोटारीपासून दुचाकीवरुन पुढे आले. त्यांनी या वृद्धेच्या अंगावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न केला. बाजूला होण्याच्या प्रयत्नात वृद्धा रस्त्याकडेला पडली. त्यानंतर तिने माळी यांना उठविले. माळी यांनी पाण्याचा मारा करुन मोटारीची आग विझविली. शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टायर खराब
मोटारीची पुढील बाजूची चाके पेटल्याने खराब झाली आहेत. तसेच इंजिनही जाळण्यात आले आहे. आगीमुळे मोटारीची पुढील बाजूची बाजू काळी पडली आहे. अंदाजे २५ हजाराचे नुकसान झाले आहे. मोटारीची पाठीमागील बाजू व टायरही जाळण्याचा प्रयत्न झाला आहे.

महिलेचा विनयभंग; तरुणाविरुद्ध गुन्हा  -

सांगली : कर्नाळ (ता. मिरज) येथे एका ४२ वर्षीय महिलेस गेल्या दीड महिन्यापासून त्रास देऊन तिचा विनयभंग केल्याचा प्रकार गुरुवारी रात्री उघडकीस आला. याप्रकरणी सर्जेराव काशिनाथ तारळेकर (वय ३५, रा. छत्रपती शिवाजी चौक, कर्नाळ) याच्याविरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित तारळेकर याने काही दिवसांपूर्वी कौटुंबिक वादातून त्याची चुलती नीलम तारळेकर (५०) यांना मारहाण केली होती. याबाबत नीलम यांनी ग्रामीण पोलिसांत तक्रार केली होती. ही तक्रार देण्यास नीलम यांना पीडित महिलेने भाग पाडल्याचा संशय तारळेकर यास होता. यातून तो दीड महिन्यापासून या पीडित महिलेस त्रास देत होता. ती घराबाहेर अंगणात धुणे-भांडी धुण्यास आल्यानंतर तारळेकर हा तिथे जाऊन उभा राहत असे. तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव करीत असे. तसेच हातइशारेही करीत असे व ‘आज तुला दाखवितो’, असे म्हणत असे. त्याच्या या दररोजच्या त्रासाला कंटाळून या महिलेने गुरुवारी रात्री सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी तारळेकर याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

भरदिवसा महिलेचे १७ तोळ्यांचे दागिने लंपास-

सांगली : येथील मुख्य बसस्थानकावर चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. प्रवासी महिलांना ‘टार्गेट’ करुन चोरटे त्यांच्या बॅगेतील दागिने हातोहात लंपास करीत आहेत. एतूर (ता. आजरा, जि. कोल्हापूर) येथील लक्ष्मी विष्णू सुतार (वय ५९) या महिलेचे तब्बल १७ तोळे दागिने चोरट्यांनी लंपास केले. बुधवारी सायंकाळी पावणेपाच वाजता ही घटना घडली. याप्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

लक्ष्मी सुतार यांची बहीण सांगलीत राहते. बहिणीच्या नातेवाईकाचे बुधवारी सांगलीत लग्न होते. यासाठी लक्ष्मी सुतार घरातील सदस्यांसोबत सांगलीत आल्या होत्या. लग्नात त्यांनी तसेच त्यांच्या घरातील अन्य महिलांनी अंगावर दागिने घातले. लग्न आटोपल्यानंतर लक्ष्मी सुतार यांनी दागिने काढून ते एका पर्समध्ये ठेवले. ही पर्स त्यांनी बॅगेत ठेवली होती. यामध्ये सोन्याचे सात तोळ्यांचे गंठण, तीन तोळ्यांचा लक्ष्मीहार, एक तोळ्याचे मंगळसूत्र, चार तोळ्यांचे आणखी एक गंठण, तसेच दोन तोळ्यांचा लक्ष्मीहार असे एकूण १७ तोळे दागिने होते. एतूरला परत जाण्यासाठी त्या दुपारी साडेचार वाजता कुटुंबासोबत सांगलीच्या मुख्य बसस्थानकावर आल्या व कोल्हापूरला जाणाऱ्या एसटी बसमध्ये त्या बसल्या. तिकीट काढण्यास पैसे घेण्यासाठी त्यांनी बॅगेची चेन उघडली, त्यावेळी त्यांना दागिने ठेवलेली पर्स दिसून आली नाही. त्यांनी घरातील अन्य महिलांकडे चौकशी केली, तसेच इतर सर्व बॅगांमध्येही शोध घेतला. पण दागिन्यांची पर्स सापडली नाही.

दागिने न सापडल्याने लक्ष्मी सुतार यांना धक्का बसला. त्या पुन्हा लग्नसमारंभ पार पडलेल्या मंगल कार्यालयात गेल्या. तिथेही चौकशी केली. मात्र काहीच सुगावा लागला नाही. त्यानंतर त्या गावी एतूरला परतल्या. घरातील लोकांशी चर्चा करुन गुरुवारी सायंकाळी त्या पुन्हा सांगलीत आल्या. रात्री उशिरा त्यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी शुक्रवारी बसस्थानकातील सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली आहे. ते त्यांना शनिवारपर्यंत मिळेल. फुटेजमध्ये या चोरीची घटना कैद झाली असण्याची शक्यता आहे, त्याआधारे तपासाला दिशा दिली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, रेकॉर्डवरील संशयित गुन्हेगारांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. मात्र अजून काहीच धागेदोरे सापडले नाहीत.

 

Web Title: Sangli Crime News - Motor Petwali - Molestation of Women; 17 pieces of lace jewelry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.