सांगली : माळवाडीमध्ये बंगला फोडून पाच लाखाचा मुद्देमाल लंपास, जैन मंदिरातील दानपेटीही फोडली : नागरिकांत भीतीचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 01:57 PM2017-12-29T13:57:56+5:302017-12-29T13:59:18+5:30
माळवाडी (ता. मिरज) येथील सुरेश अण्णासाहेब भानुसे यांचा बंगला फोडून चोरट्यांनी १५ तोळे सोन्याचे दागिने व ७८ हजार रुपयांची रोकड असा पाच लाखांचा मुद्देमाल लंपास केला. हा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. चोरट्यांनी जैन मंदिरातील दानपेटीही फोडली. या घटनेमुळे नागरिकांतून भीतीचे वातावरण आहे. याबाबत सांगली ग्रामीण पोलिसांत नोंद झाली आहे.
दुधगाव : माळवाडी (ता. मिरज) येथील सुरेश अण्णासाहेब भानुसे यांचा बंगला फोडून चोरट्यांनी १५ तोळे सोन्याचे दागिने व ७८ हजार रुपयांची रोकड असा पाच लाखांचा मुद्देमाल लंपास केला. हा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. चोरट्यांनी जैन मंदिरातील दानपेटीही फोडली. या घटनेमुळे नागरिकांतून भीतीचे वातावरण आहे. याबाबत सांगली ग्रामीण पोलिसांत नोंद झाली आहे.
सुरेश अण्णासाहेब भानुसे पुलाची शिरोली (जि. कोल्हापूर) येथे शिक्षक आहेत, तर त्यांची पत्नी संपदा या माळवाडी येथे शिक्षक आहेत. येथील शशिकांत शामराव मसुटगे यांच्या बंगल्यात ते भाडेकरू म्हणून राहतात.
भानुसे मूळचे कुंभोज (ता. हातकणंगले) येथील आहेत. बुधवारी काही कामानिमित्त ते कुंभोज येथे गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी बंगल्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाट फोडून त्यातील १५ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम ७८ हजार असा एकूण पाच लाखांचा ऐवज लंपास केला.
यानंतर चोरट्यांनी जैन मंदिराकडे मोर्चा वळविला. मंदिरातील दानपेटीही फोडली. यामधील नोटा घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. दानपेटीतील चिल्लर मात्र तशीच ठेवली. दुसऱ्यादिवशी सकाळी संपदा घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तात्काळ पती सुरेश भानुसे यांना बोलावून घेतले.
यानंतर भानुसे यांनी सांगली ग्रामीण पोलिसांत चोरीची फिर्याद दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक रत्नदीप साळुंखे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलिसांनी श्वानपथकाद्वारे चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. पण भानुसे यांच्या घरापासून कुलकर्णी यांच्या शेतातून जुन्या सावळवाडी रस्त्यापर्यंत जाऊन श्वास घुटमळले.