सांगली : वीजेच्या तारेचा धक्का बसून तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 02:00 PM2018-04-18T14:00:17+5:302018-04-18T14:00:17+5:30
कावजी खोतवाडी (ता. मिरज) येथे शेतात औषध फवारणी करीत असताना तुटलेल्या वीजेच्या तारेचा धक्का बसून तरूणाचा मृत्यू झाला. अभिजित रामचंद्र पाटील (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात त्याचे आई-वडील दोघेही गंभीर जखमी झाले आहे. ही घटना बुधवारी सकाळी सातच्या सुमारास घडली. याबाबत सांगली ग्रामीण पोलिसांत नोंद आहे.
सांगली : कावजी खोतवाडी (ता. मिरज) येथे शेतात औषध फवारणी करीत असताना तुटलेल्या वीजेच्या तारेचा धक्का बसून तरूणाचा मृत्यू झाला.
अभिजित रामचंद्र पाटील (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात त्याचे आई-वडील दोघेही गंभीर जखमी झाले आहे. ही घटना बुधवारी सकाळी सातच्या सुमारास घडली. याबाबत सांगली ग्रामीण पोलिसांत नोंद आहे.
जखमींमध्ये रामचंद्र विष्णू पाटील (वय ५२) व राजश्री पाटील (४५) यांचा समावेश आहे. त्यांना उपचारासाठी सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रामचंद्र पाटील हे आई, वडील, पत्नी व दोन मुलांसह खोतवाडीत रहातात. घराशेजारीच त्यांची शेती आहे. तर एक मुलगा पुण्यात नोकरी करतो. मंगळवारी रात्री खोतवाडी परिसरात सुसाट वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला होता. त्यांच्या शेतातून विद्युत वाहिनी गेली आहे. पाऊस व वाऱ्यामुळे वीजेची तार तुटली होती.
सकाळी सात वाजता अभिजित हा ऊसावर औषध फवारणीसाठी शेतात गेला होता. औषध फवारणी करीत असताना त्यांचा पाय वीजेच्या तारेवर पडला.
वीजेच्या जोरदार धक्क्याने तो खाली कोसळला. ते पाहून त्याची आई राजश्री या धावल्या. त्यांनी तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनाही वीजेचा धक्का बसून त्या बाजूला फेकल्या गेल्या. दोघेजण शेतात पडल्याचे पाहून वडील रामचंद्र हेही त्यांना वाचविण्यासाठी धावले. त्यांनाही धक्का बसला.
पाटील कुटूंबियाचा आरडाओरडा पाहून आजूबाजूचे लोकांनीही घटनास्थळाकडे धाव घेतली. विद्युत प्रवाह खंडीत करून तिघांनाही तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात हलविले. पण रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच अभिजितचा मृत्यू झाला होता. तर आई-वडील दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.