सांगली : डेक्कन सोसायटीने आधुनिक शिक्षणास प्राधान्य द्यावे : चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 02:13 PM2018-08-04T14:13:19+5:302018-08-04T16:09:23+5:30
डेक्कन एज्युकेशन सोसायटीने आधुनिक शिक्षणास प्राधान्य द्यावे असे आवाहन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी सांगलीत केले.
सांगली : आजच्या आधुनिक काळात शिक्षण क्षेत्रातील बदलते संदर्भ लक्षात घेता पारंपारिक शिक्षणपध्दतीला फाटा देणे आवश्यक आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखांमधून विद्यार्थ्यांना ज्ञान मिळते मात्र, स्वत:च्या पायावर उभे करू शकणारे व्यवसायाभिमुख, रोजगाराभिमुख शिक्षण देण्याची आता वेळ आली आहे. त्यामुळे डेक्कन एज्युकेशन सोसायटीने आधुनिक शिक्षणास प्राधान्य द्यावे असे आवाहन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी सांगलीत केले.
येथील विलिंग्डन महाविद्यालयाच्या शताब्दी महोत्सव प्रारंभ कार्यक्रमात पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष विकास काकतकर उपस्थित होते. यावेळी खा. संजय पाटील, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, आ. सुधीर गाडगीळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
पाटील पुढे म्हणाले की, डेक्कनसारख्या नावाजलेल्या संस्थेने आजवर अनेक नामवंत विद्यार्थी घडविले आहेत. त्यामुळे आधुनिक काळातही समाजाला दिशा देण्याचे काम संस्थेने करावे. पारंपारिक शिक्षणातून विद्यार्थ्यांना ज्ञान मिळते हे खरे असलेतरी त्याचा त्यांना रोजगारासाठी, व्यवसाय उभारणीसाठी उपयोग होत नाही. हीच गरज ओळखून राज्य शासनाने कौशल्यावर आधारित शिक्षण देणाऱ्या विद्यापीठाची स्थापना केली आहे.
सध्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. सरकार आरक्षण देण्यासाठी कटीबध्द आहे मात्र, आरक्षण दिल्यामुळे समाजाची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे का याचाही विचार व्हायला हवा. यावर उपाय म्हणून महाविद्यालयामधूनच रोजगारांच्या संधी उपलब्ध करणे गरजेचे आहे. विलिंग्डन महाविद्यालयाच्या विस्तारित अभ्यासक्रम व नवीन कोर्सेस सुरू करण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रगतीची नवीन वाट देण्यात ह्यविलिंग्डनह्णचा फार मोठा वाटा आहे. या महाविद्यालयाने गुणवान विद्यार्थी व प्रतीभावान शिक्षक दिले आहेत. २१ शतकाचा विचार करता बदलते संदर्भ लक्षात घेऊन यापुढेही नवनवीन साधनांचा उपयोग करून कौशल्यावर आधारित आणि संशोधनावर आधारित शिक्षणाला प्राधान्य द्यावे.