सांगली : आयुक्तपदाचा पदभार जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 01:52 PM2018-12-06T13:52:25+5:302018-12-06T13:54:22+5:30
महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर हे गेले १५ दिवस वैद्यकीय रजेवर आहेत. त्यामुळे महापालिकेचे कामकाज ठप्प झाले आहे. शहरात साथीच्या आजाराने थैमान घातले असून प्रशासन, नागरिक, नगरसेवकांची कामे अडली आहेत. त्यामुळे आयुक्तपदाचा कार्यभार जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवावा, अशी मागणी नागरिक जागृती मंचने बुधवारी केली.
सांगली : महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर हे गेले १५ दिवस वैद्यकीय रजेवर आहेत. त्यामुळे महापालिकेचे कामकाज ठप्प झाले आहे. शहरात साथीच्या आजाराने थैमान घातले असून प्रशासन, नागरिक, नगरसेवकांची कामे अडली आहेत. त्यामुळे आयुक्तपदाचा कार्यभार जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवावा, अशी मागणी नागरिक जागृती मंचने बुधवारी केली.
याबाबतचे निवेदन नगरविकास विभागाचे प्रधान सचिवांना फॅक्सद्वारे पाठविण्यात आले आहे. यामध्ये म्हटले आहे की, महापालिका आयुक्त वैद्यकीय रजेवर असल्याने विकासकामांचे निर्णय खोळंबले आहेत. त्याच्या फाईली प्रलंबित आहेत.
एकाच उपायुक्तांवर महापालिकेचा कारभार सुरु आहे. महापालिका लेखापरिक्षण आणि दैनंदिन कामाबाबतही तेच निर्णय घेत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कामाचा ताण आहे. महापालिकेत दोन उपायुक्त, मुख्य लेखापरिक्षक, शहर अभियंता व वर्ग दोनचे अधिकारी नियुक्त केले नसल्याने ती पदेही रिक्त आहेत.
त्यामुळे कामाच्या सुलभतेसाठी आयुक्तांचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रभारी कार्यभार सोपवण्यात यावा. हे निवेदन नगरविकास खात्याचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर आणि सचिव मनिषा म्हैसकर यांना ई मेल केल्याची माहिती नागरिक जागृती मंचचे कार्यकर्ते सतीश साखळकर यांनी दिली.