सांगली जिल्ह्यात १०३ गावांना अतिवृष्टी, महापुराचा दणका, वाळवा, शिराळा, पलूसमध्ये सर्वाधिक हानी; व्यापारी पेठेचे कंबरडे मोडले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 11:18 AM2021-08-06T11:18:57+5:302021-08-06T11:19:24+5:30
Flood in Sangli 2021: प्रलयंकारी महापुराने सांगली जिल्ह्याच्या पाच तालुक्यांतील १६ हजार हेक्टरहून अधिक शेती उद्ध्वस्त केली आहे. वाळवा आणि शिराळा तालुक्यांत शेतातील माती वाहून जमिनीतील खडक उघडे पडले आहेत.
- संतोष भिसे
सांगली : प्रलयंकारी महापुराने सांगली जिल्ह्याच्या पाच तालुक्यांतील १६ हजार हेक्टरहून अधिक शेती उद्ध्वस्त केली आहे. वाळवा आणि शिराळा तालुक्यांत शेतातील माती वाहून जमिनीतील खडक उघडे पडले आहेत. नदीकाठची मळीची दोन-पाच गुंठे शेेती वाहून गेल्याने अनेक शेतकरी भूमिहीन झाले आहेत. सांगलीच्या व्यापारी पेठेलाही मोठा दणका बसला आहे.
२०१९ च्या हानीतून सावरण्यापूर्वीच यंदा पुन्हा महापूर आल्याने जिल्ह्याचे कंबरडे मोडले आहे. मिरज, वाळवा, शिराळा, पलूस व तासगाव तालुक्यांतील नदीकाठच्या १०३ गावांत कृष्णा-वारणेने थैमान घातले, तर त्याशिवाय दहा गावांत अतिवृष्टी झाली. कोयना व चांदोली धरणांतून सोडलेल्या पाण्याने हाहाकार उडवला. आतापर्यंत १६ हजार ८७९ कुटुंबांच्या नुकसानीची माहिती नोंदविण्यात आली आहे. शिराळा तालुक्यात मणदूर, भाष्टेवाडी, कोकणेवाडी, मिरुखेवाडी, विठ्ठलवाडी, देववाडी, ठाणापुडे, डफळेवाडी, बोरगेवाडी या गावांलगतचे डोंगर खचले असून तळीयेसारख्या दुर्घटनेचे सावट आहे. महापालिका क्षेत्र, तसेच ग्रामीण भागात ४५ हजार ३५२ कुटुंबांना पुराचा फटका बसला. २८७ घरे पूर्णत: उद्ध्वस्त झाली. दीड हजार घरांची पडझड झाली आहे. पलूस व वाळवा तालुक्यांत पोल्ट्रीमध्ये पाणी शिरल्याने ५० हजार कोंबड्या मरण पावल्या. प्रशासनाने पंचनामे गतीने सुरू केले असले तरी मिळणारी मदत शेतकऱ्यांना पुन्हा उभा करण्यासाठी पुरेशी असणार नाही. नदीकाठी अनेक शेतकऱ्यांकडे पाच-दहा गुंठ्यांची शेती आहे. नदीच्या वेगवान प्रवाहाने ती खरडून काढली, त्यामुळे शेती वाहून गेली असून, हे शेतकरी कागदावरच शेतीचे मालक राहिले आहेत. वाळवा तालुक्यात सर्वाधिक ९८ गावांना, शिराळ्यात ९५, तर मिरज व पलूस तालुक्यांत प्रत्येकी २६ गावांना पुराचा फटका बसला. अतिवृष्टीने तासगावमध्येही दोन गावांत नुकसान झाले.