सांगली जिल्हा बँक राज्यात अव्वल, ढोबळ नफा ७३ कोटींचा : गतवर्षाच्या तुलनेत ४१ टक्क्यांनी नफावृद्धी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 04:00 PM2018-04-10T16:00:30+5:302018-04-10T16:00:30+5:30
अडचणींचे अनेक बांध तोडून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने २0१७-१८ या आर्थिक वर्षात ७२ कोटी ८१ लाख ३३ हजार रुपयांचा ढोबळ नफा मिळवित राज्यात अव्वल क्रमांक पटकाविला आहे. तुलनात्मकदृष्ट्या या आर्थिक वर्षात ४0.९७ टक्क्यांनी नफावृद्धी झाली आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सांगली : अडचणींचे अनेक बांध तोडून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने २0१७-१८ या आर्थिक वर्षात ७२ कोटी ८१ लाख ३३ हजार रुपयांचा ढोबळ नफा मिळवित राज्यात अव्वल क्रमांक पटकाविला आहे. तुलनात्मकदृष्ट्या या आर्थिक वर्षात ४0.९७ टक्क्यांनी नफावृद्धी झाली आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, शिल्लक नोटा, कर्जमाफी यासह अनेक कारणांनी सांगली जिल्हा बँकेसमोरील अडचणींमध्ये वाढ झाली होती. तरीही योग्य नियोजन आणि चिकाटीने काम करून बँकेने यंदा राज्यात विक्रमी नफा कमाविला आहे. नोटाबंदीनंतर बँकेकडे आठ महिने पडून असलेल्या ३१५ कोटींच्या शिल्लक जुन्या नोटांवरील व्याजाचे नुकसान २१ कोटी ६३ लाख रुपये इतके आहे.
सध्या शिल्लक असलेल्या १४ कोटीच्या जुन्या नोटांवरील व्याजाचा १ कोटी १४ लाखाचा आणि पीक कर्जवाटपात झालेला २१ कोटींच्या तोट्याचा विचार करता यंदा ११६ कोटी ५८ लाख रुपये खर्चापेक्षाचे जादा उत्पन्न ठरले असते. त्यामुळे प्रत्यक्ष नसली तरी शंभर कोटीची उद्दीष्टपूर्ती झाल्याचे चित्र आहे.
व्यवहारात झालेल्या वाढीमुळे ढोबळ एनपीए (नॉन परफॉर्मिंग असेटस्)चे प्रमाण १३.१0 टक्क्यांवरून आता ११.६0 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. ढोबळ नफ्यातून आता कोणकोणत्या तरतुदी करायच्या याबाबतचा निर्णय संचालक मंडळ घेणार आहे. त्यानंतर निव्वळ नफा स्पष्ट होईल.
राज्यातील सक्षम जिल्हा मध्यवर्ती बँकांचा विचार केला तर त्यांचा ढोबळ नफा हा ५५ कोटींच्या घरात आहे. त्यामुळे त्यांचा निव्वळ नफा २५ कोटींच्या घरात जाऊ शकतो, तर जिल्हा बँकेचा निव्वळ नफा हा त्यांच्यापेक्षा जास्त असेल त्यामुळे ढोबळ आणि निव्वळ नफ्याच्या पातळीवर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक राज्यात अव्वलच ठरणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बँकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, संचालक विलासराव शिंदे, श्रद्धा चरापले, कमल पाटील, विक्रम सावंत, उदयसिंह देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हा, सरव्यवस्थापक बी. एम. रामदुर्ग, मानसिंग पाटील उपस्थित होते.
शेतीकर्जाची वसुली घटली
कर्जमाफी योजनेत वेळोवेळी झालेल्या बदलामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढत गेल्या. त्यामुळे संपलेल्या आर्थिक वर्षात तुलनेने शेती कर्जाची वसुली ९ टक्के कमी झाली आहे. पीक कर्जवाटपही १२१ कोटींनी कमी झाले आहे, अश्ी माहिती पाटील यांनी दिली.
नोकरभरती लवकरच !
सांगली जिल्हा बँकेचा कर्मचारी आकृतीबंध हा १ हजार ४४२ चा आहे. सध्या ९८७ कर्मचारी कार्यरत आहेत. अद्याप ४६५ जागा रिक्त असून भरती प्रक्रियेला मंजुरी मिळाली असून लवकरच ही प्रक्रिया सुरू होईल.
राज्यातील काही जिल्हा बँकांमधील नोकरभरती अपारदर्शीपणाच्या संशयाने अडचणीत आली आहे. त्यामुळे आम्ही अधिक सावध आहोत. भरती टाळण्याऐवजी ती अधिक पारदर्शीपणाने करण्यावर आमचा भर राहिल, असे दिलीपतात्या पाटील म्हणाले.