सांगली जिल्हा बँकेकडील कर्ज थकबाकी ५१२ कोटींवर,कर्ज वाटपावर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:39 PM2021-07-10T16:39:40+5:302021-07-10T16:42:44+5:30
Banking Sector Sangli : काही कारखान्यांची थकीत ऊस बिले, लॉकडाऊनमुळे बाजारावर झालेला परिणाम या सर्व गोष्टींचा परिणाम जिल्हा बँकेच्या कर्ज वसुलीवर झाला आहे. सध्या जिल्ह्यातील ४३ हजारांवर सभासदांकडील ५१२ कोटी रुपयांच्या कर्जाची थकबाकी असून, थकबाकी वाढल्याने त्याचा कर्जवाटपावर परिणाम झाला आहे.
सांगली : काही कारखान्यांची थकीत ऊस बिले, लॉकडाऊनमुळे बाजारावर झालेला परिणाम या सर्व गोष्टींचा परिणाम जिल्हा बँकेच्या कर्ज वसुलीवर झाला आहे. सध्या जिल्ह्यातील ४३ हजारांवर सभासदांकडील ५१२ कोटी रुपयांच्या कर्जाची थकबाकी असून, थकबाकी वाढल्याने त्याचा कर्जवाटपावर परिणाम झाला आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक ही आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. अनेक संकटातही बँकेने नफ्याची परंपरा कायम ठेवली आहे. चालू आर्थिक वर्षात या बँकेला कर्ज वसुलीसाठी अधिक मेहनत घ्यावी लागत आहे. काही मोजक्याच साखर कारखान्यांनी ऊसाची बिले शेतकऱ्यांना न दिल्याने शेतकऱ्यांकडून कर्जाचा भरणा होऊ शकला नाही. त्यामुळे थकबाकीत भर पडली आहे. बिले मिळाल्यानंतर वसुलीला गती मिळण्याची शक्यता आहे.
एकीकडे कर्जाची थकबाकी वाढल्याने त्याचा नव्या कर्ज वाटपावर मोठा परिणाम झाला आहे. सध्या उद्दिष्टाच्या ५० टक्केच कर्जवाटप होऊ शकले आहे. कर्जवाटपातही दरवर्षी बँक आघाडीवर असते. यंदा थकबाकी असल्याने अडचणी येत आहेत. २०२०-२१ या आर्थिक वर्षात बँकेने एकूण ५,३५६ कोटी ८४ लाख रुपये कर्जाचे वाटप केले होते. यंदाही कर्जवाटपाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी कर्जवसुली महत्त्वाची आहे.
चालू आर्थिक वर्षाचा पहिला तिमाही संपला आहे. पुढील तिमाहीत म्हणजेच आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत चांगली कर्जवसुली करण्यासाठी बँकेने नियोजन केले आहे. त्यानुसार आता कर्मचाऱ्यांवर जबाबदारी दिली आहे.
दोन लाखांवरील थकबाकी १०० कोटींची
जिल्ह्यातील २ लाखांवरील कर्ज असलेल्या ८ हजार ७१३ सभासदांची थकबाकी १०० कोटींच्या घरात आहे. एकूण थकबाकीचा विचार केल्यास ४३ हजार सभासद थकबाकीत असून, त्यांची थकबाकी ५१२ कोटी रुपयांची आहे.
जिल्हा बँकेने वसुलीसाठी प्रयत्न चालवले आहेत. वसुलीला मोठ्या अडचणी नाहीत, पण थकबाकीचा परिणाम कर्जवाटपावर झाला आहे. सध्या ५० टक्के कर्जवाटप झाले आहेत. येत्या तिमाहीत चांगली वसुली व कर्जवाटप होण्याची आशा आहे.
- जयवंत कडू-पाटील,
मुख्य कार्यकारी अधिकारी, सांगली जिल्हा बँक