सांगली जिल्हा बँकेने आटपाडीतील ४० कोटींची सूतगिरणी विकली १४ कोटींत, शासनाकडून सीईओंची खरडपट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 05:44 PM2023-01-19T17:44:32+5:302023-01-19T17:44:56+5:30
शासनाच्या वस्त्रोद्योग महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी बँकेच्या आजी-माजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना नागपुरात बोलावून त्यांची कानउघाडणी केली.
सांगली : थकीत कर्जवसुलीसाठी जिल्हा बँकेने ४० कोटी वाजवी किंमत (अपसेट प्राइस) असलेली आटपाडीतील बाबासाहेब देशमुख सहकारी सूतगिरणी केवळ १४ कोटी रुपयांमध्ये विकल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. याबाबत शासनाच्या वस्त्रोद्योग महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी बँकेच्या आजी-माजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना नागपुरात बोलावून त्यांची कानउघाडणी केली.
या सूतगिरणीला जिल्हा बँकेने आधी मध्यम मुदत कर्ज दिले. या कर्जापोटी सूतगिरणीची जमीन व अन्य स्थावर, जंगम मालमत्ता तारण घेतली. या सूतगिरणीच्या आवारात विजयालक्ष्मी कॉटन मिल आहे. या मिलची मालमत्ताही बँकेच्या थकीत कर्जासाठी ताब्यात घेतली आहे. मध्यम मुदत कर्ज फिटल्यानंतर सूतगिरणीला पुन्हा १० कोटी रुपये मालतारण कर्ज दिले. यासाठी पूर्वी बँकेकडे तारण असलेलीच स्थावर व जंगम मालमत्ता पुन्हा तारण ठेवण्याचे पत्र सूतगिरणीने दिले. त्यानंतर दहा कोटींचे कर्ज थकीत राहिले. व्याजासह ही रक्कम १४ कोटींच्या घरात गेली.
थकबाकी वसुलीसाठी बँकेने संस्थेचा लिलाव काढला. त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कडू यांनी अन्य संस्थांप्रमाणे ही संस्थाही बँकेच्या नावे खरेदी केली. दरम्यान, संस्थेची पुन्हा एकदा निविदा काढली. या निविदेत बाबासाहेब देशमुख सहकारी सूतगिरणीच्या स्थावर, जंगम मालमत्तेचे मूल्यांकन करून सुमारे ४० कोटी रुपये वाजवी किंमत ठेवली. नियमानुसार ४० कोटींपेक्षा जास्त सर्वाधिक बोली असणाऱ्या निविदाधारकाला ही सूतगिरणी देणे आवश्यक होते; पण अवघ्या १४ कोटी रुपयांना तिची विक्री केली.
बँकेची येणे बाकी वसूल केली; पण या सूतगिरणीवर शासनाचे २५ कोटींचे कर्ज आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांची देणी, शासकीय कर अशी कोट्यवधी रुपयांची देणी आहेत. जिल्हा बँकेने ही देणीही लिलाव करताना वसूल करणे आवश्यक होते. बँक सोडून अन्य देणी खरेदीदार कंपनीने द्यायची आहेत, अशी अट घालून बँकेने सूतगिरणी विकली; पण खरेदीदार कंपनीने ही देणी दिलेली नाहीत.
वस्त्रोद्योग मंडळाने नागपुरात झालेल्या सुनावणीवेळी बँकेचे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कडू यांची कानउघाडणी करत हा व्यवहार नियमबाह्य असल्याचे स्पष्ट केले.