सांगली जिल्हा बँक 'या' तीन कारखान्यांना देणार ११७ कोटी रुपयांचे कर्ज
By अशोक डोंबाळे | Published: May 10, 2024 02:24 PM2024-05-10T14:24:23+5:302024-05-10T14:25:00+5:30
संचालक मंडळाने या कर्जास सहमती दिली
सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना, क्रांती अग्रणी जी. डी. बापू सहकारी साखर कारखाना व राजारामबापू सहकारी साखर कारखाना कारंदवाडी युनिट या तीन कारखान्यांना ११७ कोटी रुपयांच्या कर्जास मंजुरी देण्यात आली. बँकेच्या सभेमध्ये कर्जाला संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बँकेच्या कर्ज समितीची बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, संचालक वैभव शिंदे, बाळासाहेब होनमोरे, महेंद्र लाड आदी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीमुळे बँकेच्या संचालक मंडळाची बैठक गेल्या काही दिवसांत झाली नव्हती. मंगळवारी मतदान झाल्यानंतर कर्ज समितीची बैठक झाली. यामध्ये कारखान्याच्या कर्ज प्रकरणासह इतर काही विषयांवर चर्चा झाली. त्यात आरग येथील मोहनराव शिंदे कारखान्यास ४२ कोटी, क्रांती अग्रणी कारखान्यास ४० कोटी तर राजारामबापू कारंदवाडी युनिटला ३५ कोटी रुपये कर्ज देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. संचालक मंडळाने या कर्जास सहमती दिली आहे.
जिल्हा बँकेकडून दिलेले कर्ज
-क्रांती कारखाना : ४० कोटी
-मोहनराव शिंदे : ४२ कोटी
-राजारामबापू कारंदवाडी युनिट : ३५ कोटी