टॉप सहा थकबाकीदारांवर सांगली जिल्हा बँकेचा वॉच, या वर्षात बँकेला किती कोटींचा नफा..जाणून घ्या
By अशोक डोंबाळे | Published: April 11, 2024 06:54 PM2024-04-11T18:54:03+5:302024-04-11T18:54:20+5:30
नेट बँकिंग सुविधा देणार : मानसिंगराव नाईक
सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस या वर्षात २०४ कोटींचा नफा झाला आहे. एनपीए पुढील वर्षी पाच टक्क्यांच्या आत आणणार आहे. त्यामुळे मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग सुविधा आणि शाखा विस्ताराला परवानगी मिळेल, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष व शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. तसेच टॉपच्या सहा थकबाकीदारांकडे बँकेचे लक्ष असून, १०० टक्के वसुली होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मानसिंगराव नाईक म्हणाले, बड्या सहा कर्जदारांकडे जवळपास ४०० कोटी रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीदारांकडून वसुलीची प्रक्रिया चालू आहे. या थकबाकीदारांविरोधात सहकार न्यायालयात दावा सुरु असून, निश्चित येत्या काही दिवसात १०० टक्के वसुली होणार आहे. कर्जाची खाती एनपीएमध्ये गेलेल्यांकडून १०१ कोटी ६६ लाख रुपयांची वसुली करण्यात बँकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना यश आले आहे. खानापूर, जत, आटपाडी आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील मोठी थकबाकी कमी करण्यात यश आले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ९३५ कोटींनी ठेवी वाढून सात हजार ९०५ कोटी ठेवी झाल्या आहेत. एक हजार १६६ कोटींनी कर्जात वाढ होऊन सध्या सहा हजार ६९६ कोटींचे कर्जवाटप आहे. मागील वर्षी १३४ कोटी नफा झाला होता.
यामध्ये ७४ कोटींची वाढ होऊन यंदा २०४ कोटींचा नफा झाला आहे. बँकेने शेतकऱ्यांना ओटीएस योजनेसाठी नफ्यातून १५ कोटी प्रोत्साहन रकमेची तरतूद केली आहे. शेती कर्ज वाटपात बँकेचा जिल्ह्यातील हिस्सा ७२ टक्के आहे. आता बँक लाभांश वाटपास पात्र ठरली आहे.
जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ, संचालक अजितराव घोरपडे, मोहनराव कदम, महेंद्र लाड, संग्रामसिंह देशमुख, राहुल महाडिक, सरदार पाटील, तानाजी पाटील, पृथ्वीराज पाटील, वैभव शिंदे, सुरेश पाटील, प्रकाश जमदाडे, सत्यजित देशमुख, मन्सूर खतीब, बी.एस. पाटील, अनिता सगरे आदी उपस्थित होते.
जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती
- जिल्हा बँकेचा १४५०० कोटींचा व्यवसाय
- जिल्ह्यातील १० पैकी पाच तालुक्यांचे ठेवीचे उद्दिष्ट पूर्ण
- बँकेच्या २१८ पैकी ११३ शाखांकडून ठेवीचे उद्दिष्ट पूर्ण
- कवठेमहांकाळ, आटपाडी तालुक्यात पीक कर्जाची वसुली पूर्ण
- एनपीए वसुलीत पलूस सर्वात मागे
- बिगरशेती कर्जाची १०४२२ कोटींची वसुली
- प्रत्येक तालुक्यात एकनुसार १० शाखांना मागितली परवानगी