सांगली जिल्हा बँक 'लाडकी बहीण'साठी झिरो बॅलन्सवर खाती उघडणार
By अशोक डोंबाळे | Published: July 10, 2024 06:24 PM2024-07-10T18:24:43+5:302024-07-10T18:25:07+5:30
जिल्हा बँक केंद्र व राज्य शासनाकडून जाहीर होणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीमध्ये नेहमीच अग्रेसर
सांगली : शासनाच्या लाडकी बहीण योजनेसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जिल्ह्यातील सर्व शाखांमध्ये महिलांची झिरो बॅलन्सवर बचत खाती उघडण्यात येणार आहेत. याचा लाभार्थी महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
मानसिंगराव नाईक म्हणाले, जिल्हा बँक केंद्र व राज्य शासनाकडून जाहीर होणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीमध्ये नेहमीच अग्रेसर आहे. शेतकरी, महिला, तरुण यांच्यासह समाजातील सर्वच घटकांतील लाभार्थींना शासनाच्या जास्तीत जास्त योजनांचा लाभ मिळेल, यासाठी बॅँक प्रयत्नशील असते. शासनाने आता महिलांसाठी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलेचे बँकेत बचत खाते असणे गरजेचे आहे.
शहरासह ग्रामीण भागात अनेक महिलांची बँक खाती नाहीत. नवीन खाती उघडताना किमान रक्कम शिल्लक ठेवावी लागतात. मात्र, आता जिल्हा बँकेने लाडकी बहीण योजनेसाठी खाती उघडणाऱ्या महिलांची शून्य रक्कम (झिरो बॅलन्स) खाती उघडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत जिल्ह्यातील बँकेच्या सर्व शाखांना कळविण्यात आले आहे. कोणीही महिला बँक खाते काढण्यापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्यात येणार आहे.
मुलींच्या लग्नासाठी बँकेची 'लग्नगाठ कर्ज योजना'
मुलींच्या लग्नासाठी जिल्हा बँक ६ टक्के व्याजदराने सोसायटीमार्फत ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज देणार आहे. यासाठी बँकेने लग्नगाठ कर्ज योजना सुरू केली आहे. याबाबतचे परिपत्रक सर्व शाखांना पाठविले आहे. या योजनेसाठी बॅँकेने कोरडवाहू क्षेत्रावर प्रतिएकर २० हजार रुपये, तर बागायती क्षेत्रावर ३० हजार रुपये मात्र जास्तीत जास्त ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा गरजूंनी लाभा घ्यावा, असे आवाहन मानसिंगराव नाईक यांनी केले.