रेमडेसिविर इंजेक्शनबाबत सांगली जिल्हा टंचाईच्या काठावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 05:06 PM2021-04-15T17:06:35+5:302021-04-15T17:07:16+5:30
CroanVirus Sangli: कोरोना रुग्णांसाठी गरजेचे ठरलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या बाबतीत जिल्ह्याची स्थिती काठावरचीच आहे. बुधवारी संध्याकाळपर्यंत सुमारे १ हजार ४०० इंजेक्शन्स उपलब्ध होती. जिल्ह्याची दररोजची गरज सरासरी ७५० इंजेक्शन्स इतकी आहे.
सांगली : कोरोना रुग्णांसाठी गरजेचे ठरलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या बाबतीत जिल्ह्याची स्थिती काठावरचीच आहे. बुधवारी संध्याकाळपर्यंत सुमारे १ हजार ४०० इंजेक्शन्स उपलब्ध होती. जिल्ह्याची दररोजची गरज सरासरी ७५० इंजेक्शन्स इतकी आहे.
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या दररोजच सरासरी १०० ने वाढत आहे. त्यातील गंभीर रुग्णांना रेमडेसिविर दिले जाते. मिरज कोविड रुग्णालयासह सर्व कोविड रुग्णालयांत दररोज सरासरी ७५० इंजेक्शन्स वापरली जातात. जिल्ह्याला विविध सहा कंपन्यांची इंजेक्शन्स पुण्याहून पुरविली जातात. साठा आणि वितरणावर अन्न व अौषध प्रशासनाचे नियंत्रण आहे. मिरज कोविड रुग्णालयाला थेट शासनाकडून पुरवठा होतो, तर अन्य रुग्णालयांसाठी कंपन्या पुरवतात. या सर्वांची नोंद अन्न व अौषध प्रशासनाकडे होते.
या नोंदीनुसार मिरज कोविड रुग्णालयाकडे बुधवारी संध्याकाळपर्यंत ८८० इंजेक्शन्स उपलब्ध होती. अन्य कोविड रुग्णालयांमधील अौषध दुकानांत ५५० इंजेक्शन्सचा साठा होता. गुरुवारी किंवा शुक्रवारपर्यंत हा साठा संपण्याची शक्यता आहे. नवा पुरवठा शुक्रवारी होणार असल्याची माहिती अन्न व अौषध प्रशासनाने दिली. यदाकदाचित तो लांबला तर मात्र आणिबाणीची स्थिती निर्माण होऊ शकते.
मंगळवारी पाडवा व बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सुट्ट्यांमुळे रेमडेसिविरचा पुरवठा दोन दिवस होऊ शकला नाही, त्यामुळे टंचाईस्थिती निर्माण झाली. गुरुवारी जिल्ह्यातील सर्व कोेविड रुग्णालयांत इंजेक्शन उपलब्ध असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. थेट औषध दुकानांमधून विक्रीस मनाई करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन भांडारकर व निरिक्षक विकास पाटील वितरणावर नियंत्रण ठेवत आहेत.
रेमडेसिविरचा दोन दिवसांपुरता साठा उपलब्ध आहे. आणखी मागणी केली आहे. शुक्रवारी पुरवठा होण्याची अपेक्षा आहे. सध्यातरी जिल्ह्यात कोठेही टंचाई नाही. सर्व कोविड रुग्णालयांत उपलब्ध आहेत.
- विकास पाटील,
निरिक्षक, अन्न व अौषध प्रशासन