सांगली जिल्हा बँक चौकशीचे तळ्यात-मळ्यात सुरूच, अधिकारीही चक्रावले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 06:24 PM2023-03-02T18:24:22+5:302023-03-02T18:24:41+5:30
चौकशी समितीला मुदतीत अहवाल सादर करण्याचे आदेश
सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गैरव्यवहाराच्या चौकशीला ‘ब्रेक’ लागला असतानाच मंगळवारी सहकार विभागाने आणखी एक पत्र पाठवून चौकशी समितीला मुदतीत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे चौकशीला स्थगिती मिळावी म्हणून राजकीय हालचालींना वेग आला आहे. कधी चौकशी सुरू होते, तर कधी थांबते, त्यामुळे अधिकारीही चक्रावून गेले आहेत.
विभागीय सहनिबंधकांच्या अध्यक्षतेखालील पाचजणांच्या समितीने तक्रारीच्या अनुषंगाने बँकेतील अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची चौकशी अंतिम टप्प्यात आणली होती. २८ फेब्रुवारीला त्यांचा अहवाल सादर होणार होता; मात्र अंतिम टप्प्यात पथक बँकेत फिरकलेच नाही. त्यामुळे तक्रारदारांनी याबाबत विचारणा केली होती. चौकशी थांबल्याची तक्रार तक्रारदार सुनील फराटे यांनी सहकार विभागाकडे केल्याने सहकार विभागाने २८ फेब्रुवारीस पुन्हा आदेश काढून मुदतीत अहवाल सादर करण्याची सूचना दिली. त्याचवेळी चौकशीस स्थगिती मिळविण्यासाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.
विभागीय सहनिबंधक डी.टी. छत्रीकर यांच्या अध्यक्षतेखालील पथकात विशेष लेखापरीक्षक शीतल चोथे, संजय पाटील, अनिल पैलवान, द्वितीय अपर लेखापरीक्षक रघुनाथ भोसले यांचा समावेश आहे. तक्रारीनुसार बँकेकडून माहिती घेऊन कागदपत्रांची मागणी करण्यात आली होती.
फराटे यांनीच जिल्हा बँकेतील कारभाराबाबत सहकार आयुक्त कार्यालयाकडे तक्रार केली होती. याप्रकरणी चौकशीचे आदेश यापूर्वी दिले होते. परंतु चौकशीला २३ सप्टेंबर २०२१ रोजी महाविकास आघाडी सरकारकडून स्थगिती देण्यात आली होती. दोन महिन्यांपूर्वी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सहकारमंत्र्यांकडे बँकेच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे.
मार्चमुळे अडचणी
चौकशी समितीला आवश्यक ती मदत करणाऱ्या जिल्हा बँकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर आता मार्चच्या वसुलीचे उद्दिष्ट दिले आहेत. संपूर्ण बँक वसुलीच्या कामात व्यस्त आहे. त्यामुळे चौकशी पथकाला मदत करायची की बँकेचे उद्दिष्ट पूर्ण करायचे, असा प्रश्नही कर्मचाऱ्यांना पडला आहे.