सांगली : शिवसेनेच्या मेळाव्यात जिल्हाप्रमुखांना झापले; गजानन कीर्तीकरांकडून झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 04:19 PM2018-04-17T16:19:39+5:302018-04-17T16:19:39+5:30
सांगली महापालिकेवर भगवा फडकविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शिवसेनेच्या जिल्ह्यातील नेत्यांना खासदार गजानन कीर्तीकर यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पदाधिकारी मेळाव्याला हाताच्या बोटावर मोजण्याइतपत बुथप्रमुख व उपतालुकाप्रमुखांची उपस्थिती पाहून कीर्तीकर चांगलेच संतापले. त्यांनी व्यासपीठावरच दोन्ही जिल्हाप्रमुखांना बोलावून, मेळाव्याला नुसती गर्दी केली आहे का? सैन्य हाताखाली नाही, मग लढाई कशी जिंकणार?, आम्ही दूधखुळे वाटतो का? अशा प्रश्नांची सरबत्तीच केली. कीर्तीकरांच्या रौद्रावताराने मेळाव्याचा रंगच पालटला.
सांगली : महापालिकेवर भगवा फडकविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शिवसेनेच्या जिल्ह्यातील नेत्यांना खासदार गजानन कीर्तीकर यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पदाधिकारी मेळाव्याला हाताच्या बोटावर मोजण्याइतपत बुथप्रमुख व उपतालुकाप्रमुखांची उपस्थिती पाहून कीर्तीकर चांगलेच संतापले.
त्यांनी व्यासपीठावरच दोन्ही जिल्हाप्रमुखांना बोलावून, मेळाव्याला नुसती गर्दी केली आहे का? सैन्य हाताखाली नाही, मग लढाई कशी जिंकणार?, आम्ही दूधखुळे वाटतो का? अशा प्रश्नांची सरबत्तीच केली. कीर्तीकरांच्या रौद्रावताराने मेळाव्याचा रंगच पालटला.
महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी येथील भावे नाट्यगृहात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी खा. गजानन कीर्तीकर, शिवसेनेचे सचिव खा. अनिल देसाई, महिला आघाडीच्या प्रमुख छायाताई कोळी, संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील उपस्थित होते.
मेळाव्याला मार्गदर्शन करीत असतानाच गजानन कीर्तीकर यांनी, किती बुथप्रमुख व उपतालुकाप्रमुख उपस्थित आहेत, याचा आढावा घेतला. उपस्थित पदाधिकाऱ्यांना हात वर करण्यास सांगितले. त्यावेळी अगदी पाच ते सहा जणांनीच हात वर करून आपली हजेरी दर्शवली. या प्रकारामुळे कीर्तीकर चांगलेच संतापले.
जिल्हाप्रमुख संजय विभुते व आनंदराव पवार यांना कीर्तीकर यांनी समोर बोलावून घेतले. कशाला आमची फसवणूक करता? आम्ही काय दूधखुळे आहोत का? असा सवाल करीत त्यांना झापले. हातात सैन्य नसताना लढाई जिंकण्यास निघाला आहात. अशा पद्धतीने संघटना चालत नाही.
मतदारांपर्यंत पोहोचण्याची व्यवस्थाच नाही. केवळ मेळाव्याला गर्दी केली आहे. चार ते पाच नगरसेवकांवर आपण समाधान मानणार आहात का? या दोन्ही जिल्हाप्रमुखांच्या नेमणुका रद्द कराव्या लागतील, अशा शब्दात त्यांंनी दम भरला.
येत्या पंधरा ते वीस दिवसात पुन्हा मेळावा बोलवा. तेव्हा केवळ बुथप्रमुख व उपतालुकाप्रमुखच उपस्थित असतील. मेळाव्याला जे पदाधिकारी उपस्थित राहणार नाहीत, त्यांना घरी घालविले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. कीर्तीकरांच्या संतापाने मेळाव्याचा नूरच पालटला.