जीवघेण्या डीजे, लेसरची सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल
By संतोष भिसे | Published: October 16, 2023 06:04 PM2023-10-16T18:04:26+5:302023-10-16T18:04:53+5:30
सांगली : गणेशोत्सवात अवघ्या जिल्ह्याच्या छातीची धडधड वाढविणाऱ्या जीवघेण्या डीजे आणि लेसरच्या अतिरेकाची दखल जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी ...
सांगली : गणेशोत्सवात अवघ्या जिल्ह्याच्या छातीची धडधड वाढविणाऱ्या जीवघेण्या डीजे आणि लेसरच्या अतिरेकाची दखल जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी घेतली आहे. नवरात्रोत्सवात त्यावर प्रतिबंधासंदर्भात कायदेशीर तरतुदींनुसार भूमिका घेतली जाईल असे त्यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.
गणेशोत्सवात यंदा ध्वनीमर्यादेवर निर्बंध नसल्याने डीजेचा अतिरेक झाला. घणाघाती आवाजाने काही तरुणांचे बळीही घेतली. कानठळ्या बसविणाऱ्या आवाजामुळे शेकडो तरुणांच्या कानात बिघाड झाल्याच्या तक्रारी येत आहेत. मिरज व सांगलीत शासकीय रुग्णालयात कानाचा पडदा तपासण्यासाठी गेल्या महिन्याभरात अनेक तरुण आले. शिवाय मिरवणुकीदरम्यान, लेसरच्या वापरानेही अनेक तरुणांना दृष्टीदोषाचा सामना करावा लागत आहे. अनेकांच्या डोळ्यांतील बुब्बुळांमध्ये दोष निर्माण झाले आहेत.
उत्सवात डीजे आणि लेसरच्या वापराविरोधात सार्वजिनक विरोध वाढत आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी म्हणाले, डॉक्टरांच्या संघटना, तसेच काही सामाजिक संघटनांनी यासंदर्भात प्रशासनाकडे निवेदने दिली आहेत. उत्सवाची परंपरा, व्यावसायिक बाबी आणि लोकांचे आरोग्य या सर्वांचा एकत्रित विचार करुन निर्णय घेतला जाईल. नवरात्रोत्सवात डीजे व लेसरच्या वापराविषयी विचार केला जाईल.
दरम्यान, या मानवी शररीराला घातक असलेल्या डीजे व लेसरविरोधात स्वत: डॉक्टरांनीच भूमिका घेतल्याने प्रशासनालाही त्याची गांभीर्याने दखल घेणे भाग पडले आहे. शासनाने डीजे, लेसरवर निर्बंध आणावेत, आवाजाची मर्यादा निश्चित करावी अशी मागणी होत आहे.