सांगली जिल्हा सुधार समिती घेणार खड्डे आॅलिम्पिक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 01:50 PM2017-10-25T13:50:01+5:302017-10-25T13:56:23+5:30
सांगली महापालिका हद्दीतील खराब रस्त्यांच्या प्रश्नावर सांगली जिल्हा सुधार समितीतर्फे प्रशासनाला जाग आणण्यासाठी ह्यखड्डे आॅलिम्पिकह्ण स्पर्धा घेण्यात येणार आहे. शनिवारी, २८ रोजी शंभरफुटी रस्त्यापासून या आंदोलनाची सुरुवात होणार असल्याची माहिती समितीचे कार्याध्यक्ष अॅड. अमित शिंदे, प्रा. आर. बी शिंदे व आर्किटेक्ट रवींद्र चव्हाण यांनी दिली.
सांगली ,दि. २५ : महापालिका हद्दीतील खराब रस्त्यांच्या प्रश्नावर सांगली जिल्हा सुधार समितीतर्फे प्रशासनाला जाग आणण्यासाठी खड्डे आॅलिम्पिक स्पर्धा घेण्यात येणार आहे. शनिवारी, २८ रोजी शंभरफुटी रस्त्यापासून या आंदोलनाची सुरुवात होणार असल्याची माहिती समितीचे कार्याध्यक्ष अॅड. अमित शिंदे, प्रा. आर. बी शिंदे व आर्किटेक्ट रवींद्र चव्हाण यांनी दिली.
याबाबत अॅड. शिंदे म्हणाले की, या खड्डे आॅलिम्पिकमध्ये विजयी होणाऱ्या नागरिकांना बॅन्डेज व झंडुबामच्या बाटल्या बक्षीस म्हणून देण्यात येणार आहेत. विजेत्यांच्यावतीने महापालिका पदाधिकारी व अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाईपूर्व नोटीसदेखील देण्यात येईल.
सुधार समितीने खड्ड्यांभोवती रांगोळी काढणे, दिवे लावणे, फुले टाकणे अशी अनोखी आंदोलने केली. त्यांना नागरिकांचाही प्रतिसाद लाभला. तरीही प्रशासनाने हा प्रश्न गांभीर्याने घेतलेला नाही. महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग केवळ रस्त्यांचे पॅचवर्क व डागडुजीशिवाय काहीच करत नाही.
पॅचवर्क काही दिवसातच निघून जात असल्याने रस्त्यांची अवस्था पुन्हा जैसे थे होते. महापालिका क्षेत्रात जिथे जिथे खराब रस्ते आहेत, तिथे खड्डे आॅलिम्पिक स्पर्धा भरविण्यात येणार आहे. यामध्ये खड्ड्यांमधून धावणे, लांबउडी, अडथळा शर्यत यासारखे विविध प्रकारचे खेळ घेण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. या स्पर्धेचे संयोजन समितीचे जयंत जाधव, तानाजी रुईकर, रवींद्र काळोखे व कार्यकर्त्यांनी केले आहे.