अल्पवयीन मुलीस गैरकृत्यास भाग पाडणाऱ्या दोघांना दहा वर्षांची शिक्षा, सांगली जिल्हा न्यायालयाचा निकाल
By शरद जाधव | Published: March 1, 2023 05:44 PM2023-03-01T17:44:44+5:302023-03-01T17:47:30+5:30
पीडित मुलीला आरोपी भोरे शिक्षणासाठी घरी घेऊन आली होती
सांगली : अल्पवयीन मुलीस मारहाण करून तिला गैरकृत्य करण्यास भाग पाडणाऱ्या दोघांना न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. शैला देवदासी भोरे (वय ४९, रा. काननवाडी, ता. मिरज) आणि रोहित हणमंत आसुदे (२५, रा. नागठाणे, ता. पलूस) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. जादा सहजिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. महात्मे यांनी हा निकाल दिला. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील आरती देशपांडे-साटविलकर यांनी काम पाहिले.
पीडित मुलीला आरोपी भोरे शिक्षणासाठी घरी घेऊन आली होती. सुरुवातीला दोन महिने तिचा चांगला सांभाळ केल्यानंतर तिला भोरे मारहाण करू लागली. यानंतर जोगव्याच्या कार्यक्रमासाठी तिला नाचकाम, देवाची गाणी म्हणण्यास ती जबरदस्ती करत होती. काम करण्यास नकार दिल्यानंतर तिला मारहाण केली जात असे.
ऑक्टोबर २०१७ मध्ये भोरे हिने पीडितेला बुर्ली (ता. पलूस) येथे नेत आरोपी राेहित आसुदे याच्याशी तिची ओळख करून दिली.
यावेळी हा मुलगा आपल्या जोगव्याच्या फडामध्ये यायला पाहिजे, त्यासाठी तू त्याला भुरळ घाल, त्याच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित कर, नाहीतर तुला मारून टाकीन, अशी धमकी भोरे हिने तिला दिली होती. यानंतर आरोपी आसुदे याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यानंतर तिला काननवाडी येथे आणून पायाला बेडी बांधून, झोपडीच्या छताला लोखंडी सळईला उलटे लटकवून तिच्या अंगावर, गुप्तांगावर काठीने मारहाण करण्यात आली.
११ जुलै २०१९ मध्ये आरोपी भोरे ही पीडितेला पंढरपूर येथे घेऊन गेली व तिथे वयस्कर माणसाशी तिला लग्न कर, त्याच्याकडून सोने, इतर वस्तू मागून घेे असे म्हणाली. याला तिने नकार दिला. यावर तिला तिथेच सोडून भोरे परत आली. अखेर भीक मागून पैसे गाेळा करून ती घरी आली. यावेळी पुन्हा तिला झाडाला बांधून काठीने निदर्यपणे मारहाण करण्यात आली. तेथून सुटका करून घेत तिने एमआयडीसी कुपवाड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. सहायक पोलिस निरीक्षक ए. जे. उबाळे यांनी तपास केला.
अखेर न्यायालयाने दोन्ही आरोपींना दहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावत ७५ हजार रुपयांचा दंडही केला.