सांगली जिल्ह्यात नाही शंभर टक्के साक्षरतेचे एकही गाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 12:00 AM2017-09-08T00:00:17+5:302017-09-08T00:01:48+5:30
सांगली : साक्षरतेचे प्रमाण राज्याच्या सरासरीप्रमाणे वाढत असले तरी, शंभर टक्के साक्षर असलेले एकही गाव जिल्ह्यात आढळलेले नाही. ९१ ते ९९ टक्क्यांपर्यंत साक्षर असणाºया जिल्ह्यातील गावांची एकूण संख्या केवळ ११ आहे.
अविनाश कोळी।
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : साक्षरतेचे प्रमाण राज्याच्या सरासरीप्रमाणे वाढत असले तरी, शंभर टक्के साक्षर असलेले एकही गाव जिल्ह्यात आढळलेले नाही. ९१ ते ९९ टक्क्यांपर्यंत साक्षर असणाºया जिल्ह्यातील गावांची एकूण संख्या केवळ ११ आहे. शंभर टक्के हागणदारीमुक्त, शंभर टक्के वीजपुरवठायुक्त, शंभर टक्के तंटामुक्त, शंभर टक्के चांगले रस्ते व सुविधांनी युक्त गावे निर्माण करण्यासाठी मोहिमा घेण्यात आल्या. मात्र शंभर टक्के साक्षर गावासाठी मोहीम आजवर राबविली नाही.
जिल्ह्यात सद्यस्थितीत निरक्षर लोकांची संख्या ७ लाख ७२ हजार ६७६ इतकी मोठी आहे. निरक्षरतेत मिरज तालुका सर्वात आघाडीवर आहे. याठिकाणी एकूण २ लाख ९ हजार ४२५ निरक्षर लोक आहेत. त्याखालोखाल जतमध्ये १ लाख २७ हजार ४८६ इतके निरक्षर लोक आहेत. गावांच्या संख्येची वर्गवारी केली, तर आजही जिल्ह्यात १९ गावे ५१ ते ६0 टक्के साक्षरतेच्या घरात आहेत. समाधानाची बाब म्हणजे, सर्वाधिक गावांची संख्या ८१ ते ९0 टक्के साक्षरतेच्या घरात आहे. एकूण ३0५ गावे या वर्गात आहेत. त्याखालोखाल २५५ गावे ७१ ते ८0 टक्के साक्षरतेच्या घरात आहेत. ६१ ते ७0 टक्के साक्षर असलेल्या गावांची संख्या १३५ इतकी आहे. तरीही एकही गाव शंभर टक्के साक्षर नाही.
जिल्ह्यात साक्षर लोकसंख्या २0 लाख ८६ हजार ६२५ इतकी असून याची टक्केवारी ८१.४८ इतकी आहे. महिला व पुरुषांची तुलना केली, तर जिल्ह्यात आजही महिला मागे आहेत. पुरुष आणि महिला साक्षरतेमध्ये १३.६३ टक्के इतकी तफावत आहे. पुरुष साक्षरतेची जिल्ह्याची टक्केवारी ८८.२२ इतकी चांगली असताना, महिला साक्षरतेचे प्रमाण ७४.५९ इतके कमी आहे.
ग्रामीण भाग पिछाडीवर
महिला व पुरुष साक्षरतेप्रमाणेच शहरी व ग्रामीण साक्षरतेची अवस्था आहे. आजही ग्रामीण भाग साक्षरतेत शहरांच्या तुलनेत खूप मागे आहे. शहरी भागाचे साक्षरता प्रमाण ८६.२४ टक्के असून ग्रामीणचे प्रमाण ७९.८४ इतके आहे. ग्रामीण साक्षरतेच्या बाबतीत पलूस तालुका ८६.११ टक्क्यांनी सर्वात आघाडीवर आहे, तर जत तालुका ७0.३७ टक्क्यांनी सर्वात पिछाडीवर आहे.
तालुकानिहाय साक्षरता (टक्केवारी)
तालुका एकूण पुरुष महिला
शिराळा ७८.८८ ८९.३६ ६८.८0
वाळवा ८४.८७ ९१.२९ ७८.१३
पलूस ८६.११ ९0.९६ ८0.९६
कडेगाव ८0.९८ ८८.९८ ७३.0५
खानापूर ८0.२४ ८९.0७ ७१.८२
आटपाडी ७२.७४ ८२.३४ ६३.२४
तासगाव ८२.४५ ८९.१९ ७५.५७
मिरज ८२.१९ ८९.२६. ७४.७७
क.महांकाळ ७८.५७ ८६.५७ ७0.३९
जत ७0.३७ ७८.२९ ६२.१0
एकूण ८१.४८ ८८.२२ ७४.५९
शहरी भागातील साक्षरता (टक्केवारी)
शहर एकूण पुरुष महिला
इस्लामपूर ८७.८८ ९२.६२ ८२.९९
आष्टा ८३.६0 ८९.५२ ७७.३२
विटा ८७.२७ ९२.0८ ८२.२९
तासगाव ८८.0२ ९२.९८ ८२.८७
सां.मि.कु. ८५.९१ ९0.0२ ८१.७७