सांगली जिल्ह्यात ऐन पावसाळ्यामध्ये केवळ ३० टक्केच पाणीसाठा, अकरा प्रकल्प पडले कोरडे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 01:03 PM2022-07-28T13:03:28+5:302022-07-28T17:58:20+5:30
गतवर्षीच्या तुलनेत ६ टक्के पाणीसाठा कमी
अशोक डोंबाळे
सांगली : जिल्ह्यातील ८३ प्रकल्पांमध्ये नऊ हजार ४४०.२० दशलक्ष घनफूट पाणी साठविण्याची क्षमता आहे. सध्या प्रकल्पात तीन हजार ६४९.१४ दशलक्ष घनफूट पाणी असून उपयुक्त पाणीसाठा केवळ ३० टक्केच आहे. गतवर्षीच्या तुलनेत ६ टक्के पाणीसाठा कमी आहे. दहा तलाव कोरडे तर २१ पाझर तलावात मृत पाणीसाठा असून ते कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत.
पाच मध्यम आणि ७९ लघू प्रकल्पांमध्ये ९ हजार ४४० दशलक्ष घनमीटर पाणीसाठ्याची क्षमता आहे. पावसाळा संपण्याच्या मार्गावर असतानाही या प्रकल्पांमध्ये तीन हजार ६४९.१४ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. प्रकल्पातील पाण्याचा विचार केल्यास ते ३० टक्केच भरले आहेत. पावसाचा जोर वाढला नाही, तर प्रकल्प १०० टक्के भरण्याची शक्यता धूसर आहे.
पावसाळ्यातच आटपाडी तालुक्यातील पाच, कवठेमहांकाळ तालुक्यातील तीन, तासगाव तालुक्यातील दोन प्रकल्प कोरडे ठणठणीत असल्याचा सांगली पाटबंधारे विभागाचा अहवाल आहे. जिल्ह्यातील २१ प्रकल्पांतील पाणीसाठा मृतसाठ्यापेक्षा कमी आहे. हे प्रकल्पही कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यातील १९ प्रकल्पांत केवळ २५ टक्के तर १९ प्रकल्पांत ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे.
पाच प्रकल्पांमध्ये ७५ टक्के तर चार तलावांमध्येच शंभर टक्के पाणीसाठा आहे. पाच शंभर टक्के भरलेल्या प्रकल्पांपैकी चार शिराळा व एका वाळवा तालुक्यातील प्रकल्पाचा समावेश आहे. प्रकल्पातील पाण्याचा विचार केल्यास ते केवळ ३० टक्केच भरले आहेत. पावसाचा जोर वाढला नाही, तर प्रकल्प १०० टक्के भरण्याची शक्यता धूसर आहे. मागील वर्षी याच तारखेला जिल्ह्यातील ८३ प्रकल्पांत ३६ टक्के पाणीसाठा होता.
जिल्ह्यात ८४ टक्के पेरणी
जिल्ह्यात जुलै महिन्यात १०० टक्के पेरणी होत होती. पण, पावसाने ओढ दिल्यामुळे केवळ ८४ टक्केच पेरणी झाली आहे. मिरज तालुक्यात ६५.९ टक्के, जतमध्ये ९१.१ टक्के, खानापूर ५५.५ टक्के, वाळवा ९८.५ टक्के, तासगाव ८३.३ टक्के, शिराळा १००.२ टक्के, कवठेमहांकाळ ९०.२ टक्के, पलूस ९६.८, कडेगाव ६९.८ टक्के तर आटपाडी तालुक्यात केवळ ४८.५ टक्केच पेरण्या झाल्या आहेत.
जिल्ह्यातील प्रकल्पातील पाणीसाठा
तालुका - एकूण साठा - सध्याचा साठा - टक्केवारी
तासगाव - ७०८.९९ - २८०.२९ - २८
खानापूर - ६६३.०४ - २८८.०७ - ३४
कडेगाव - ७६४.५० - ३९९.१५ - ४३
शिराळा - १०७१.३२ - १०२६.५२ - ९५
आटपाडी - १३६७.३६ - ३७७.३१ - २०
जत - ३६२८.४७ - ९६२.४६ - १७
क.महांकाळ - ९५६.५० - २२५.५६ - १४
मिरज - १४१.६५ - ६५.८४ - ३७
वाळवा - ५१.७३ - २३.९४ - ४३
एकूण - ९४४०.२० - ३६४९.१४ - ३०