सांगली जिल्ह्यात रंगल्या छुप्या लढती
By admin | Published: October 10, 2014 11:14 PM2014-10-10T23:14:35+5:302014-10-10T23:36:02+5:30
विधानसभा निवडणूक : उमेदवारांच्या खांद्यावर नेत्यांची बंदूक; तीन मतदार संघांवर लक्ष
सांगली : उमेदवारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून प्रतिस्पर्ध्यांवर ‘नेम’ धरण्याचे प्रकार यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वाढले आहेत. जिल्ह्यातील सांगली, मिरज, इस्लामपूर आणि तासगाव-कवठेमहांकाळ या मतदारसंघात दिग्गज नेत्यांनी ताकद लावल्याने अशा छुप्या लढती रंगल्या आहेत.
गत विधानसभा निवडणुकीत केवळ सांगली मतदारसंघात अशी छुपी लढत होती. राष्ट्रवादीचे नगरसेवक तसेच त्यांचे नेते जयंत पाटील यांची मदत छुप्या पद्धतीने संभाजी पवारांना मिळाली होती. असे प्रकार आता तीन मतदारसंघात पहावयास मिळत आहेत. सांगलीत पुन्हा जयंत पाटील यांनी त्यांची ताकद राष्ट्रवादीचे सुरेश पाटील यांच्या मागे लावली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले माजी आमदार दिनकर पाटील यांनी आता थेट भाजपचा प्रचार सुरू केला आहे, मात्र त्यांना मानणारा राष्ट्रवादी नगरसेवकांचा गटही छुप्या पद्धतीने भाजपची मदत करीत आहे. जयंत पाटील यांनी जसे सांगलीत लक्ष घातले आहे त्याचपद्धतीने माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी इस्लामपुरात छुप्या पद्धतीने ‘फिल्डिंग’ लावली आहे.
तासगाव - कवठेमहांकाळ मतदारसंघात माजी गृहमंत्री आर. आर. पाटील आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्यात लढत असली तरी, खासदार संजय पाटील यांची ताकद घोरपडेंच्या मागे लागली आहे. ही लढत आर. आर. व संजय पाटील यांच्यात असल्याचे चित्र निर्माण केले आहे. लोकसभा निवडणुकीतही प्रतीक पाटील आणि संजय पाटील यांचे युद्ध नावाला दाखवून तासगाव-कवठेमहांकाळमध्ये या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांनी एकमेकांची ताकद पणाला लावली होती. मिरज मतदारसंघातही कॉँग्रेसच्या काही स्थानिक नेत्यांनी अपक्ष उमेदवार सी. आर. सांगलीकर यांना छुपे पाठबळ दिले आहे. छुप्या लढतींमुळे राजकीय समीकरणे बदलली आहेत. निकालाचा अंदाज घेणेही त्यामुळे मुश्किल झाले आहे. प्रतिस्पर्धी नेता छुप्या पद्धतीने कोणत्या खेळ्या करीत आहे, याचा परिपूर्ण अंदाज यावा म्हणून काहींनी कार्यकर्त्यांची स्वतंत्र टीम तयार केली आहे. छुप्या हालचालींवर ‘वॉच’ ठेवून त्यानुसार रणनीतीत बदल करण्याचीही तयारी काही नेत्यांनी सुरू केली आहे. सर्वाधिक छुप्या घडामोडी सांगली, मिरज आणि तासगावात घडत आहेत.
जाहीर पाठबळ एकाला आणि मदत दुसऱ्याच उमेदवाराला करण्याचे धोरणही सांगलीच्या राजकीय पटावर दिसत आहे. सांगली व मिरजेतील पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचीही अशा छुप्या घडामोडींमुळे संभ्रमावस्था वाढली आहे. (प्रतिनिधी)
धक्कादायक निकालांचीही चर्चा
जिल्ह्यातील काही मतदारसंघात धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दृश्य स्वरूपात चित्र वेगळे दिसत असले तरी, निकालात वेगळे चित्र अनुभवास येऊ शकते, असे काही राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या कुरघोड्यांमुळे असे धक्कादायक निकाल समोर येऊ शकतात. उमेदवार सतर्क असले तरी, प्रत्येक पातळीवर अशा छुप्या घडामोडींवर लक्ष ठेवणे किंवा त्यावर रणनीती बदलणेही शक्य नाही. उमेदवारांकडे प्रचारासाठी वेळ कमी असल्याने अशा घडामोडींबाबत अधिक सतर्क राहणेही त्यांच्या आवाक्यात नाही.
प्रतिस्पर्धी नेता कोणत्या खेळ्या करीत आहे, याचा परिपूर्ण अंदाज यावा म्हणून काहींनी कार्यकर्त्यांची स्वतंत्र टीम तयार केली आहे. छुप्या हालचालींवर ‘वॉच’ ठेवून त्यानुसार रणनीतीत बदल करण्याचीही तयारी काही नेत्यांनी सुरू केली आहे.