प्रधानमंत्री आवास घरकुलमध्ये सांगली जिल्हा राज्यात तिसरा, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये झाला गौरव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 12:35 PM2022-11-25T12:35:18+5:302022-11-25T12:35:56+5:30
सांगली : प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेमध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राज्यस्तरीय तृतीय क्रमांकाचा पुरस्कार सांगली जिल्ह्याला ...
सांगली : प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेमध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राज्यस्तरीय तृतीय क्रमांकाचा पुरस्कार सांगली जिल्ह्याला मिळाला आहे. याबद्दल जिल्हा परिषद अधिकाऱ्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मुंबईत गुरुवारी गौरव करण्यात आला.
‘सर्वांसाठी घरे- २०२४’ या शासनाच्या धोरणांतर्गत अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून केंद्रपुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना योजनांची गतीने प्रभावी अंमलबजावणी करणे व कामात गुणवत्ता आणणे, हा या अभियानाचा हेतू होता. या अभियानात राज्यात प्रथम क्रमांक गोंदिया जिल्ह्याने तर द्वितीय क्रमांक नांदेड जिल्ह्याने पटकविला आहे.
सांगली जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडूनही उत्कृष्ट कामगिरी झाली आहे. अनेक घरकुलांची कामे पूर्ण करण्यासही त्यांनी प्राधान्य दिले होते. या कामगिरीमुळे जिल्हा राज्याला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. याबद्दल अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव, राहुल गावडे, डॉ. तानाजी लोखंडे यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमामध्ये राज्यात राबविण्यात येणाऱ्या ‘अमृत महाआवास अभियान २०२२-२३’ या अभियानाचा शुभारंभही करण्यात आला. यावेळी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार, राज्य व्यवस्थापन कक्ष- ग्रामीण गृहनिर्माणचे संचालक डॉ. राजाराम दिघे आदी उपस्थित होते.