सांगली जिल्ह्याची पोलीस भरती रद्द!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 11:47 PM2018-02-18T23:47:21+5:302018-02-18T23:47:32+5:30
सचिन लाड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : संपूर्ण राज्यात मार्च २०१८ मध्ये पोलीस भरतीची प्रक्रिया राबविली जात असताना, सांगलीची पोलीस भरती यावर्षी रद्द करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस दलात केवळ २६ जागा रिक्त असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याच्या २६ जागा व यावर्षी होणाºया रिक्त जागा मिळून पुढील वर्षी भरती घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
राज्यात प्रत्येक वर्षी जिल्हानिहाय पोलीस भरतीची प्रक्रिया राबविली जाते. वशिलेबाजीला कोणताही थारा दिला जात नाही. गुणवत्तेच्या जोरावर तरुण-तरुणी पोलीस भरतीसाठी उतरतात. गेल्या काही वर्षांत बेरोजगारांची संख्या वाढल्याने पोलीस भरतीसाठी हजारो तरुण-तरुणी उतरत आहेत; पण जेवढ्या जागा रिक्त आहेत, तेवढ्याच जागांसाठी भरती केली जाते. विशेषत: वर्षभरात किती पोलीस कर्मचारी सेवानिवृत्त झाले, हे पाहून जागेचा निकष लावला जातो; परंतु लोकसंख्येच्या प्रमाणात भरतीला प्राधान्य दिले जात नाही. वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रत्येकवर्षी जागा वाढवून मागतात. मात्र, गृह विभागाकडून त्याला मंजुरी मिळत नाही. याचा परिणाम दैनंदिन कामावर होत आहे.
सांगली जिल्ह्यातही लोकसंख्येच्या तुलनेत जिल्ह्यात पोलिसांची संख्या अत्यंत अपुरी आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यात कर्मचाºयांचा अपुरा स्टाफ आहे. अशा अवस्थेतच काम सुरू आहे. प्रत्येकवर्षी ५० पेक्षा जास्त जागांसाठी भरती होते. २०१७मध्ये जिल्हा पोलीस दलात
२६ कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे एवढ्याच जागांसाठी भरती घेण्याची मर्यादा आहे. २६ जागा अत्यंत कमी आहेत. एवढ्या जागांसाठी पाच हजारांहून अधिक उमेदवार येऊ शकतात. यासाठी किमान दीड महिना प्रक्रिया राबवावी लागते. तसेच संपूर्ण पोलीस दलाचा वेळ खर्ची होतो. यासाठी यावर्षी भरती रद्दचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याच्या २६ जागा व यावर्षी होणाºया रिक्त जागा अशी एकत्रित जागांची संख्या वाढवून पुढीलवर्षी भरती घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
सर्वाधिक जागा : पुणे, साताºयाला
कोल्हापूर परिक्षेत्रात सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर ग्रामीण व पुणे ग्रामीण हे पाच जिल्हे येतात. महाराष्टÑ पोलीस दलाच्या संकेतस्थळावर भरती प्रक्रियेची सर्व मािहती प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये सांगली व कोल्हापूरला एकही जागा दिसत नाही. सातारा १२१ व पुणे ग्रामीणमध्ये सर्वाधिक १२१ जागांसाठी भरती होत आहे. सोलापूर ग्रामीणमध्ये ६३ जागांसाठी भरती होत आहे.