सांगली जिल्ह्याला अतिवृष्टी नुकसानीचे मिळाले 'इतके' कोटी, सहा महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर शेतकऱ्यांना दिलासा
By अशोक डोंबाळे | Published: April 19, 2023 07:19 PM2023-04-19T19:19:35+5:302023-04-19T19:19:57+5:30
४५ हजार ८६८ शेतकर्यांच्या २१ हजार ८८७.३५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान
सांगली : जिल्ह्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे द्राक्ष, डाळींबांसह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले होते. ४५ हजार ८६८ शेतकर्यांचे २१ हजार ८८७.३५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले होते. पिकांच्या पंचनाम्यानंतर नुकसानीचा अहवाल शासनाला पाठविला होता. जिल्ह्यातील ४१ हजार ८१५ शेतकर्यांच्या बँक खात्यावर ४६ कोटी रुपयांची रक्कम वर्ग केली आहे.
जिल्ह्यातील ५१ शेतकर्यांच्या दुबार नुकसानीची नोंद असल्याने भरपाई राखून ठेवली आहे. गेल्या सहा महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर पिकांची नुकसानभरपाई मिळाल्याने शेतकर्यांना दिलासा मिळाला.
जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली होती. वादळी वार्यासह तुफान पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामात पिकांचे नुकसान झाले होते, त्यामध्ये सोयाबीन, मका, ज्वारी, तूर, भुईमूग, उडीद, मूग, सूर्यफूल, बाजरी, हरभरा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा समावेश होता.
प्रशासनाने दि. २४ नोव्हेंबर २०२२ रोजी अतिवृष्टी, अतिपावसामुळे नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्याचा अहवाल अंतिम केला होता. यामध्ये शिराळा तालुक्यातील एकाही शेतकर्याचे नुकसान झाले नव्हते. उर्वरित नऊ तालुक्यांतील ४५ हजार ८६८ शेतकर्यांच्या २१ हजार ८८७.३५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसान भरपाईसाठी जिल्हा प्रशासनाने ४७ कोटी २५ लाख १५ हजार रुपये निधीची मागणी शासनाकडे केली होती.
जिल्ह्यात सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिन्यात जिल्हयात नुकसान झालेल्या ४१ हजार ८१५ शेतकर्यांच्या नुकसानभरपाईपोटी ४६ कोटी रुपयांची रक्कम बँक खात्यावर वर्ग केली आहे.