सांगली जिल्ह्यात दरवर्षीपेक्षा पाऊस कमीच बरसला, दुष्काळी तालुक्यात समाधानकारक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 12:21 PM2022-10-04T12:21:16+5:302022-10-04T12:21:41+5:30

तलावांसह धरणांमध्ये यंदा १०० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा जमा झाला आहे.

Sangli district received less rainfall than every year, satisfactory for a drought taluk | सांगली जिल्ह्यात दरवर्षीपेक्षा पाऊस कमीच बरसला, दुष्काळी तालुक्यात समाधानकारक

सांगली जिल्ह्यात दरवर्षीपेक्षा पाऊस कमीच बरसला, दुष्काळी तालुक्यात समाधानकारक

googlenewsNext

अशोक डोंबाळे

सांगली : जून ते सप्टेंबर हा चार महिन्यांचा मोसमी पावसाचा हंगाम पूर्ण होत असताना जिल्ह्याच्या सरासरीच्या तुलनेत १७.६८ टक्के कमी पावसाची नोंद झाली. यंदाही सर्वाधिक पाऊस शिराळा तालुक्यात कोसळला असताना मिरज, जत, आटपाडीसह अनेक भागांत सरासरीच्या तुलनेत आणि दरवर्षीपेक्षा कमी पाऊस झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, तलावांसह धरणांमध्ये यंदा १०० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा जमा झाला आहे.

राज्यात मान्सून वेळेवर पोहोचला. त्यामुळे यंदा चांगलाच पाऊस बरसेल, असे वाटले होते. मात्र, मान्सून पोहोचून देखील जून महिना पूर्ण कोरडा गेला. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांची चिंता वाढली होती. गेल्या वर्षी जून २०२१ मध्ये जिल्ह्यात सरासरीच्या १५७ टक्के पाऊस झाला होता. जून २०२२ मध्ये जिल्ह्यात सरासरी १९८.६ मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ८४.९ मिलीमीटर पाऊस झाला. सरासरीच्या तुलनेत केवळ ४२.७ टक्के पाऊस झाला. गतवर्षीच्या तुलनेत चक्क ११४.४ टक्के पाऊस कमी झाला.

जुलै २०२१ मध्ये सरासरी १३५ मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित होते. त्यापैकी ३२१.४ मिलीमीटर म्हणजेच २३७.२ टक्के पाऊस झाला होता. जुलै २०२२ मध्ये मात्र सरासरीच्या १०६.५ टक्केच पाऊस झाला असून १३०.७ टक्के कमी पाऊस झाला. ऑगस्ट २०२१ महिन्यात सरासरीच्या ५४.४ टक्के पाऊस झाला. ऑगस्ट २०२२ मध्ये मात्र ९६.६ टक्के पाऊस झाला. गतवर्षीच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात ४२.२ टक्के जादा पाऊस झाला. सप्टेंबर २०२१ महिन्यात सरासरी १३८.६ मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ९१.८ मिलीमीटर पाऊस झाला असून सरासरीच्या ६६.२ टक्के पाऊस झाला.

सप्टेंबर २०२२ या महिन्यात सरासरी १७१.७ मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित असताना २१५ मिलीमीटर पाऊस झाला असून, १२५.२ टक्के पाऊस झाला.
सप्टेंबर महिन्यातही गतवर्षीपेक्षा चक्क १०५.५ टक्के जादा पाऊस झाला आहे. जून, जुलै महिन्यात सरासरीच्या निम्माही पाऊस जिल्ह्यात झाला नाही. याची भरपाई परतीच्या पावसाने ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात भरून काढली आहे. परंतु, परतीचा पाऊसही गतवर्षीच्या पावसाची बरोबरी करू शकला नाही. गतवर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत एकूण ६८८.८ मिलीमीटर तर यावर्षी एकूण ५८५.३ मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्हात गेल्या वर्षी पेक्षा या वर्षी १७.६८ टक्के पाऊस कमी झाला आहे.

परतीचा मान्सूनच भारी

मान्सून पावसाने वेळेत हजेरी लावली. पण, जून महिन्यात गतवर्षीच्या तुलनेत ११४.४ टक्के तर जुलै महिन्यात १३०.७ टक्के कमी पाऊस झाला. गतवर्षीच्या तुलनेत जून आणि जुलै महिन्यात सरासरीच्या निम्माही पाऊस झाला नाही. परतीच्या मान्सूनने मात्र जोरदार हजेरी लावली. ऑगस्ट २०२२ मध्ये गतवर्षीच्या तुलनेत ४२.२ टक्के जादा तर सप्टेंबर २०२२ या महिन्यात सरासरीच्या १२५.२ टक्के पाऊस झाला असून, गतवर्षीपेक्षा चक्क १०५.५ टक्के जादा पाऊस झाला आहे. यामुळे मान्सून पेक्षा परतीच्या मान्सून पावसानेच जिल्ह्याला दिलासा दिला आहे.

आटपाडी, कवठेमहांकाळला सर्वाधिक पाऊस

आटपाडी, कवठेमहांकाळ तालुके नेहमी दुष्काळग्रस्त म्हणून ओळखले जात आहेत. या दोन्ही तालुक्यांतील पिके परतीच्या पावसावरच अवलंबून आहेत. पण, यावर्षी जुलैमध्ये सरासरीपेक्षा आटपाडी तालुक्यात ३२६.३ टक्के तर कवठेमहांकाळ तालुक्यात २५७.५ टक्के पाऊस झाला. आतापर्यंत जुलै महिन्यात पडलेला विक्रमी पाऊस असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक शिराळाच

जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबरपर्यंत सर्वाधिक पाऊस हा शिराळा तालुक्यातच झाला आहे. तो म्हणजे, १२०९.१ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तसेच सर्वात कमी पाऊस आटपाडी तालुक्यात ३९६.४ मिलीमीटर झाला आहे.

Web Title: Sangli district received less rainfall than every year, satisfactory for a drought taluk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.