सांगली जिल्ह्यात ४५०० जणांचा अवयवदाचा संकल्प :‘सिव्हिल’चा पुढाकार; मिरजेत प्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 09:31 PM2018-08-17T21:31:10+5:302018-08-17T21:34:54+5:30
भारतीय संस्कृतीत ‘दाना’ला विशेष महत्व आहे. याच ‘दान’ शृखलेत अवदानास महत्व प्राप्त झाले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाच्याद्दष्टिने अवयवदानाचे महत्व वाढल्याने हे आजच्या युगातील सर्वश्रेष्ठ दान ठरत आहे.
सचिन लाड
सांगली : भारतीय संस्कृतीत ‘दाना’ला विशेष महत्व आहे. याच ‘दान’ शृखलेत अवदानास महत्व प्राप्त झाले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाच्याद्दष्टिने अवयवदानाचे महत्व वाढल्याने हे आजच्या युगातील सर्वश्रेष्ठ दान ठरत आहे. मृत्यूनंतर आपले अवयव दान करुन गरजू रुग्णांचे प्राण वाचवता येऊ शकतात. कायमस्वरुपी अवयव निकामी झालेल्या रुग्णांसाठी अवयवदान हा एक आशेचा किरण बनला आहे. अवयवदानाची ही चळवळ सांगली जिल्ह्यात चांगल्याप्रकारे रुजविण्यासाठी वसंतदादा पाटील शासकीय (सिव्हिल) रुग्णालयाने पुढाकार घेतला आहे. यातूनच गेल्या दोन वर्षात साडेचार हजार जणांनी अवयदाचा संकल्प केला आहे.
जिवंत व्यक्ती आपल्या मुलगा, मुलगी, आई, वडील, भाऊ, बहिण अथवा पती-पत्नी, अशा रक्तातील नातेवाईकांना अवयवदान करु शकते. या व्यतिरिक्त कोणत्या रुग्णासाठी अवयवदान करायचे असल्यास शासनाची परवानगी घ्यावी लागते. जिवंत व्यक्तीच्या जीवन पद्धतीत व प्रकृतीवर कोणताही वितरित परिणाम होणार नाही, याची दक्षता घेऊनच त्या व्यक्तीस अवयवदान करण्यास परवानगी दिली जाते. जिवंत व्यक्ती मुत्रपिंड अथवा यकृताचा काही भाग दान करु शकते.
मानवी अवयव प्रत्यारोपण म्हणजे आधुनिक वैद्यकीय शास्त्राची मोठी उपलब्धीच आहे. या उपचारामध्ये एखाद्या जिवंत अथवा मृत व्यक्तीचा अवयव किंवा अवयवाचा काही भाग शस्त्रक्रियेद्वारे क्लिग करुन तो एखाद्या गरजू रुग्णामध्ये प्रतिरोपित केला जातो. मृत्यूनंतर हृदयक्रिया बंद पडलेल्या व्यक्तीचे केवळ नेत्र व त्वचा, या अवयवाचे दान करता येते. मृत व्यक्तीत हृदयविक्रया बंद पडल्यामुळे अन्य अवयवांचा रक्त पुरवठा थांबलेला असतो. त्यामुळे हे अवयव प्रतिरोपणासाठी उपयोगी नसतात. मृत्यूनंतर हृदयक्रिया सुरु असलेल्या व्यक्तीचे मुत्रपिंड, फुफ्फुस, यकृत, स्वादूपिंड, हृदय, आतडी नेत्र, त्वचा, हृदयाची झडप आणि कानाचे ड्रम या अवयवांचे दान करता येतात.
अवयवादानामुळे सात जणांना जीवदान
मृत व्यक्तीच्या अवयवदानामुळे सात गरजू रुग्णांना जीवनदान मिळते. अवयवदान प्रतिरोपणाची मिरज शासकीय रुग्णालयात सोय आहे. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याचे अवयवदान करावे, यासाठी शासकीय रुग्णालयातील समदेशन केंद्र स्थापन केले आहे. अविनाश शिंदे हे समुपदेशनप्रमुख आहेत. तेच मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना अवयवदानाचे महत्व सांगतात. प्रबोधनात्मक चळवळ चांगल्याप्रकारे राबविली जात असल्याने अवयवदानाची चळवळ जिल्ह्यात चांगल्याप्रकारे रुजत आहे.
अवयवदान चळवळीला यश
वर्षे संकल्प व्यक्ती
२०१७ : १७००
२०१८ : २८००
अवयवनासाठी काय करावे?
अवयवदानाचा संकल्प करायचा असल्याचे संबंधित व्यक्तीने शासकीय रुग्णालयातील नेत्र समुपदेशन केंद्राशी संपर्क साधावा. केंद्रातील समुपदेश अविनाश शिंदे हे अवयवदानाचा अर्ज भरुन घेतात. यासाठी संबंधित व्यक्तीचा एक फोटो व साक्षीदार म्हणून त्याच्या दोन नातेवाईकांच्या सह्या लागतात. अर्ज भरल्यानंतर त्यास ‘दानपत्र’ कार्ड दिले जाते.
केंद्र व राज्य शासनाने अवयवदानाची सुरु केलेली ही मोहिम अत्यंत महत्वकांक्षी आहे. यासाठी आरोग्य विभागाने मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरु केली आहे. एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे किमान सात ते आठ लोकांना जीवनदान मिळू शकते. भविष्यात ही मोहिम आणखी वेग पकडेल. अवयवदानाची ही चळवळ क्रांती करेल.
- डॉ. संजय साळुंखे, जिल्हा शल्य चिकित्सक, सांगली.
सांगली, मिरजेतील शासकीय रुग्णालयात अवयवदानासाठी शासनाने परवानगी दिली अहे. ‘ब्रेन डेड’ने मृत्यू झालेल्या रुग्णाचे अनेक अवयव दान करुन घेतात येतात. यासाठी दोन्ही रुग्णालयात अशाप्रकारचा कोणी रुग्ण उपचारासाठी दाखल आहे का, याची तपासणी करण्यासाठी दोन डॉक्टरांची कमिटी आहे. ‘ब्रेन डेड’ने रुग्णाचा मृत्यू झाल्यास ही कमिटी त्याच्या नातेवाईकांचे अवयवदानासाठी प्रबोधन करतात.
- डॉ. पल्लवी सापळे, अधीष्ठाता, शासकीय रुग्णालय, सांगली.